कोकरुड :
माळेवाडी (ता.शिराळा) येथील अश्विनी अरुण गोसावी या महिलेने धाडसाने बिबट्याला कोंडून घातल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. ही महिला सुकलेले कपडे आणायला घराच्या वरच्या मजल्यावर गेली होती. तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. प्रसंगावधान राखून तिने दरवाज्याची कडी लावून बिबट्याला कोंडून घातले. तद्नंतर बिबट्यास जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले. या महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. झाशीच्या राणीने केले बिबट्याला जेरबंद असा सूर उपस्थित जनसमुदायातून व्यक्त होत होता.
याबाबत कोकरूड पोलीस, वन विभाग व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माळेवाडी येथील गोसावी वस्तीत बाळू आनंदा गोसावी यांचे दुमजली घर आहे. वरच्या मजल्यावर असलेली खोली अडगळीचे सामान व इतर साहित्य, कपडे सुकविण्यासाठी वापरतात. या खोलीचा दरवाजा रात्रभर उघडा होता. रविवारी शेजारी असलेल्या शौचालयाच्या पायऱ्यांवरून बिबट्या उघड्या दरवाजा मधून आत येऊन कॉटखाली बसला होता.
सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास बाळू गोसावी यांची सून अश्विनी गोसावी या कपडे आणावयास गेल्या असता त्यांना कॉटखाली काहीतरी बसलेले दिसले. प्रथमदर्शनी त्यांना कुत्रे आहे असे वाटले व त्यांनी धुडकावण्याचा प्रयत्न केला. तसा तो गुरगुरुत हल्ला करु लागला. त्याचे तोंड दिसले नाही. मात्र अंगावरील पट्ट्यावरून त्यांना शंका आली हा वेगळाच प्राणी आहे. त्यांनी त्वरित घराचा दरवाजा लावून दाराला कडी लावली आणि खिडकीतून बघितले.

- वनविभाग अजून किती परीक्षा बघणार
मी घरच्या वरील मजल्यावर सुकलेले कपडे आणायला गेलं असता तिथे दबा धरून बसलेल्या प्राण्याने गुरगुरायला सुरुवात केली. मला वाटले कुत्रे असावे. मी धाडसाने चार पावले पुढे जाऊन त्यास हटकले. त्याने माझ्यावर हल्ला केला. मात्र मी प्रसंगावधान राखून दरवाजा लावून घेतला, म्हणून माझा जीव वाचला. वनविभाग लोकांची अजून किती परीक्षा बघणार आहे. ते स्वतः बिबट्या पकडणार आहेत की आम्ही पकडून द्यायचा, असा प्रश्न अश्विनी अरुण गोसावी यांनी उपस्थित केला.








