वृत्तसंस्था/ राजकोट
इंग्लंडविरुद्ध येथे सुरू असलेल्या कसोटीतून भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने माघार घेतली असल्याचे बीसीसीआयने शुक्रवारी सांगितले. कौटुंबिक कारणासाठी त्याने माघार घेतल्याचे सांगण्यात आले.
तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने कसोटीमध्ये 500 बळींचा टप्पा गाठण्याचा पराक्रम केला. त्यानंतर काही तासांनीच त्याने हा निर्णय घेतला. कुटुंबात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याने त्याला हा निर्णय घ्यावा लागला असून तो चेन्नईला परतला आहे. ‘अश्विनने कसोटी संघातून लगेचच माघार घेतली आहे. त्याच्या घरी आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याने तो माघारी परतला आहे. अशा या संकटसमयी बीसीसीआय व संपूर्ण संघ त्याच्या पाठीशी राहील,’ असे बीसीसीआयने निवेदनात म्हटले आहे. नेमकी कोणती समस्या निर्माण झाली आहे, हे मात्र बीसीसीआयने स्पष्ट केले नाही. त्याच्या प्रायव्हसीचा आदर केला जावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
तिसऱ्या कसोटीच्या उर्वरित भागात भारताला आता दहा खेळाडूंनिशी खेळावे लागणार असून रांची व धरमशाला येथे होणाऱ्या कसोटीतही अश्विन खेळणार नाही. या दोन कसोटीत ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या जागी स्थान मिळू शकते. याशिवाय जयंत यादव व जलज सक्सेना आणि युवा पुलकित नारंग हे ऑफस्पिनरही संघात उपलब्ध आहेत.









