वृत्तसंस्था/ मेलबर्न
रविचंद्रन अश्विनच्या मैदानावरील साथीची उणीव आपल्याला जाणवेल, हे भारताचा अव्वल अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने कबूल केले असून आपल्याला अश्विनच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीबद्दल घोषणा करण्याच्या फक्त पाच मिनिटे आधी समजल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. जडेजा आणि अश्विन यांनी बरोबरीने गोलंदाजी करून भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहे. कसोटींच्या बाबतीत विशेषत: मायदेशी हे दोघे म्हणजे संघाची बलस्थाने होती.
अश्विनसोबत केवळ भारतीय संघातूनच नव्हे, तर आयपीएलमध्येही मैदानात वावरणाऱ्या जडेजाला आपल्या मैदानावरील या मार्गदर्शकाने एवढा मोठा निर्णय घेतला आहे याची जाणीव नव्हती. ‘मला त्याबद्दल शेवटच्या क्षणी, पत्रकार परिषदेच्या पाच मिनिटे आधी कळले. कोणी तरी मला सांगितले की, असे घडणार आहे. आम्ही संपूर्ण दिवस एकत्र घालवला होता आणि त्याने मला एक संकेतही दिला नाही. पण अश्विनचे मन कसे वागते ते सर्वांना माहीत आहे’, असे जडेजाने मेलबर्नमध्ये पत्रकारांना सांगितले.
अश्विन माझ्या मैदानावरील मार्गदर्शकाप्रमाणे राहिला. आम्ही बरीच वर्षे ‘बॉलिंग पार्टनर’ म्हणून एकत्र खेळलेलो आहोत. मैदानावर सामन्याची परिस्थिती कशीही राहो, आम्ही एकमेकांना संदेश देत राहायचो. मला या सर्व गोष्टींची उणीव भासेल, असे जडेजा पुढे म्हणाला.









