आयपीएलमधील नव्या स्टारची मुंबईविरुद्ध धमाकेदार खेळी : सूर्याचा सुपला शॉट, हिटमॅनही विक्रमाचा मानकरी
वृत्तसंस्था/ चंदिगड
मुंबई इंडियन्सचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह.. भल्या भल्या फलंदाजांना देखील बुमराहविरुद्ध खेळताना घाम फुटतो. मात्र, पंजाब किंग्जचा स्टार फलंदाज आशुतोष शर्माने बुमराहला एका गुडघ्यावर बसून स्वीप शॉट मारला अन् तोही सिक्स. आशुतोषचा शॉट पाहून प्रेक्षकांच्या देखील भूवया उंचवल्या गेल्या. आशुतोष खेळत असताना पंजाब हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते पण आशुतोषची विकेट पडली अन् मुंबईकरांनी सुटकेचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, या सामन्यात आशुतोषने बुमराहला मारलेला स्वीप सिक्स शॉट… या षटकाराचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. सध्या बुमराह जोरदार फॉर्ममध्ये आहे, अशात बुमराहविरुद्ध स्वीप शॉट खेळण्याची हिंमत आशुतोष दाखवल्याने त्याचे कौतुक होत आहे.
दरम्यान, या सामन्यानंतर आशुतोषने सांगितले की, हा शॉट म्हणजे त्याची स्वप्नपूर्ती झाल्यासारखी आहे. तो म्हणाला, ‘बुमराहला स्वीप शॉट खेळणे माझे स्वप्न होते. मी या शॉटचा सराव केला होता, पण मी तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध मारला. यानंतर तो मजेने म्हणाला, पण ठिक आहे, हा खेळाचाच एक भाग आहे. संजय बांगर सरांनी मला सांगितलं की, मी स्लॉगर नाहीये. मी आडवे तिडवे शॉट खेळू शकतो. त्यांचं हे छोटं वाक्य होतं. पण माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी त्याने सांगितले.
आशुतोष हा मध्य प्रदेशातील रतलाम जिह्यातील रहिवासी आहे. तो रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आतापर्यंत खेळलेल्या 4 फर्स्ट क्लास, 7 लिस्ट ए आणि 16 टी-20 सामन्यात त्याने अनुक्रमे 268, 56 आणि 450 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडला होता.
बूम-बूमचा जलवा
पंजाबविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेरच्या षटकामध्ये विजय मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये 21 रन देऊन पंजाबचे 3 गडी बाद केले. बुमराहच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स 9 धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी झाली. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या बुमराहने आतापर्यंत 7 सामन्यात 13 बळी घेतले आहेत. तो सध्या पर्पल कॅपचा मानकरी असून आगामी सामन्यातही त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे, हे निश्चित.
पॉवरप्लेमध्ये पाडतोय षटकारांचा पाऊस
‘हिटमॅन‘ने यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 297 धावा बनवल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 30 चौकार आणि 18 षटकार निघाले आहेत. विशेष म्हणजे, रोहित आयपीएलच्या या हंगामात पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज आहे. रोहितने या हंगामात पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत एकूण 13 षटकार लगावले आहेत. तो केवळ राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात पॉवर प्ले मध्ये षटकार लगावण्यापासून चुकला. पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याच्या बाबतीत इतर फलंदाज रोहितच्या आसपासही नाहीत. एकीकडे रोहितने पॉवर प्लेमध्ये एकट्यानं 13 षटकार लगावले आहेत, तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सची संपूर्ण टीम मिळून केवळ 12 षटकार लगावू शकली आहे तर चेन्नई सुपर किंग्जनं पॉवर प्ले मध्ये 11 षटकार लगावले आहेत.
याशिवाय, पंजाबविरुद्ध सामन्यात रोहित शर्माने आणखीन एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. रोहितने 25 चेंडूत 36 धावांची खेळी केली. यादरम्यान रोहितने 2 चौकार आणि 3 षटकार लगावले. या खेळीदरम्यान रोहितने मुंबईकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत 224 षटकार ठोकले आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या पोलार्डने 223 षटकार लगावले आहेत. हार्दिक पंड्या (105) तिसऱ्या, इशान किशन (103) चौथ्या स्थानी आहेत.
सूर्याचा अफलातून सुपला शॉट
सूर्यकुमार यादवने 8 व्या षटकात रबाडाने एक लेन्थ बॉल टाकला. सूर्याने क्रीजच्या आत राहून त्याच्या शॉट बुक्समधून ‘सुपला शॉट काढला आणि चेंडू फाइन लेग स्टँडवर पोहोचवला. विशेष म्हणजे, सूर्याने या शॉटसाठी कागिसो रबाडाचा वेग वापरला आणि चेंडूला योग्य वेळी टाईम केले.









