नवी दिल्ली :
कोटक महिंद्रा बँकेने अशोक वासवानी यांची नव्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. अशोक वासवानी हे बँकेचे संस्थापक उदय कोटक यांची जागा घेतील. 1 जानेवारी 2024 पासून बँकेच्या नव्या एमडी व सीईओ पदाची सुत्रे अशोक वासवानी हाती घेतील.
यादरम्यान गेल्या 1 सप्टेंबर रोजी संस्थापक उदय कोटक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या पश्चात हे पद सहव्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता तात्पुरते सांभाळत असून 31 डिसेंबर 2023 पर्यंत ते जबाबदारी पार पाडणार आहेत.
कोण आहेत वासवानी
अशोक वासवानी हे सध्याला अमेरिका-इस्रायलमधील वित्त तंत्रज्ञान कंपनी पगाया टेक्नॉलॉजीसचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी सिटी ग्रुप व बार्कलेजसह इतर जागतिक बँकांमध्ये सेवा बजावली आहे. बँकेने सांगितले की 2 वर्षासाठी वासवानी यांच्या नियुक्तीला रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली आहे.
नियमानुसार बँकेला तीन जणांची नावे या पदाकरीता पाठवण्यात आली होती. यात बँकेच्या बाहेरील व्यक्तीही असावी असे मत होते. त्याप्रमाणे बँकेचे 2 वरिष्ठ अधिकारी के व्ही एस मणियन व शांती एकाम्बरम यांची नावे पदाकरीता चर्चेत होती. पण अखेर यात वासवानी यांनी बाजी मारली आहे.









