वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिंदुजा समुहातील भारतीय ऑटो कंपनी अशोक लेलॅन्ड यांनी जपानमधील जागतिक स्तरावर इलेक्ट्रीक मोटर निर्मिती कंपनी निडेक मोटर कॉर्पोरेशन यांच्यासोबत भागिदारी केली आहे. अशोक लेलॅन्ड या भागिदारीच्या माध्यमातून इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती करणार असल्याचे समजते.
व्यावसायिक वाहनांची निर्मिती करण्यासाठी कंपनी निडॅक यांची मदत घेणार आहे. निडॅक यांच्याकडून वाहनासाठी आवश्यक असणाऱ्या संशोधन आणि विकासासंबंधातले योगदानही घेणार असल्याचे समजते. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये सहकार्याचा करार करण्यात आला असून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. अशोक लेलॅन्ड निडेक यांच्याकडून मदत घेताना भारतातील वाहनांची मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले जात आहे.









