सांगली :
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मंताडा राजा दयानिधी यांची सहव्यवस्थापकीय संचालक सिडको नवी मुंबई येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या ठिकाणी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. नवे जिल्हाधिकारी काकडे आजच पदभार स्विकारण्याची शक्यता आहे.
काकडे यांनी यापुर्वी 2004 साली निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून सांगली होते. त्यांना जिल्हयाची संपूर्ण माहिती असल्याने त्यांच्या नियुक्तीने अपेक्षा वाढल्या आहेत. डॉ. दयानिधी यांनी 29 जुलै 2022 रोजी सांगलीत जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारला होता. त्यांच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र अभ्यागत कक्षाची सुरवात करण्यात आली. भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांना बैठक हॉलमध्ये एकत्रित बसवून ते आस्थेने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना थेट आदेश देत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका त्यांच्या काळात यशस्वीपणे पार पडल्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. मंगळवारी दुपारी त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले. तर जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांचीही सातारा प्रांताधिकारी म्हणून बदली झाली आहे. पुरवठा विभागाला शिस्त लावण्याबरोबरच पारदर्शी कारभारावर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या ठिकाणी अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.








