राजस्थानाचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आपले निवडणूक नामांकनपत्र 6 नोव्हेंबरला सादर करणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या नामांकनाच्या वेळी काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. गेहलोत हे आपल्या पारंपरिक सरदारपुरा मतदारसंघातून नामांकनपत्र सादर करतील. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
शक्तीप्रदर्शन कार्यक्रमात काँग्रेसचे अनेक मोठे नेते सहभागी होणार आहेत. त्यांच्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश असेल. अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, काँग्रेसचे राजस्थान प्रभारी सुखजिंदरसिंग रंधावा आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गोविंद सिंह डोटारसा हे नेतेही सहभागी होणार आहेत.
मैदानातून निघणार मिरवणूक
शक्तीप्रदर्शनाची मिरवणूक जोधपूर येथील उम्मेद मैदानातून निघणार आहे. त्याआधी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत मल्लिकार्जुन खर्गेही भाषण करणार आहेत. त्यानंतर मिरवणुकीने जाऊन नामांकनपत्र सादर केले जाणार आहेत. प्रत्येकवेळी गेहलोत नामांकनपत्र सादर केल्यानंतर जाहीर सभेचे आयोजन करत आलेले आहेत. यावेळी आधी सभा घेतली जाणार आहे, अशी माहिती त्यांच्या प्रचारप्रमुखांनी शनिवारी दिली.
शुभमुहूर्त साधून सादरीकरण
मुख्यमंत्री गेहलोत हे 6 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजून 15 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर नामांकनपत्र सादर करतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा शुभमुहूर्त त्यांच्या विश्वासातील ज्योतिषाने काढून दिला असल्याचीही चर्चा आहे. राजस्थानात यंदा विधानसभा निवडणुकीत तीव्र चुरस अपेक्षित आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता प्रचारात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी प्रयत्नशील आहे. गेहलोत यांनीही आपल्या शक्तीप्रदर्शनाची तयारी त्यादृष्टीने केली आहे.









