लडाख केंद्रशासित प्रदेशासाठी नेमले उपराज्यपाल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गोवा राज्याच्या राज्यपालपदी केंद्र सरकारने पुसापती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे हरियाणाच्या राज्यपालपदी आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपालपदी अनुक्रमे प्राध्यापक अशीमकुमार घोष आणि कविंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून या नियुक्त्यांची घोषणा एका पत्रकाद्वारे सोमवारी करण्यात आली.
लडाखचे उपराज्यपाल ब्रिगेडियर डॉ. बी. डी. मिश्रा यांनी त्यांच्या पदाचा त्याग केल्यामुळे या केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपालपदी कविंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा, आणि इतर घटनात्मक संरक्षणाच्या तरतुदी करण्यात याव्यात, या मागण्यांसाठी या केंद्रशासित प्रदेशात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने दिला होता. या पार्श्वभूमीवर बी. डी. मिश्रा यांनी पदत्याग केला असे बोलले जाते.
गोव्याच्या भावी राज्यपालांचा अल्पपरिचय
गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलेले पुसापती अशोक गजपती राजू हे तेलगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमध्ये नागरी विमानवाहतूक मंत्री होते. ते आंध्र प्रदेशातील पुसापती येथील राजघराण्याचे वारसदार आहेत. विझियानगारम या संस्थानाचे अंतिम महाराजा विजयराम गजपती राजू यांचे कनिष्ठ पुत्र आहेत. ते आंध्र प्रदेशच्या विधानपरिषदेचे 25 वर्षे सदस्य होते. तसेच आंध्र प्रदेशमध्ये ते 13 वर्षे मंत्रीही होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध विभागांची धुरा सांभाळली होती. आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध सिंहाचलम मंदिर हे या शाही कुटुंबाचे आहे. स्वत: अशोक गजपती राजू हे दानधर्म आणि शिक्षणप्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे राज्यात प्रसिद्ध आहेत. त्यांचे पिता विजयराम आणि बंधू आनंद हे देखील भारताच्या संसदेचे सदस्य होते, तसेच आंध्र प्रदेशात मंत्रिपदीही राहिले आहेत.
हरियाणासाठी घोष यांची नियुक्ती
हरियाणा राज्याचे नवे राज्यपाल म्हणून अशीम कुमार घोष यांची नियुक्ती घोषित करण्यात आली आहे. नवे राज्यपाल आणि उपराज्यपाल लवकरच आपल्या पदांचा भार स्वीकारणार आहेत. ते ज्या दिवशी पदभार स्वीकारतील, त्या दिवसापासून त्यांच्या कार्यकाळाचा प्रारंभ होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









