वृत्तसंस्था/ माले, मालदिव्ज
भारताचे युवा बॅडमिंटनपटू अश्मिता चलिहा व रवी यांनी येथे झालेल्या मालदिव्ज आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेत महिला व पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले.
अश्मिता सध्या जागतिक मानांकनात 46 व्या स्थानावर असून तिने अंतिम लढतीत आपल्याच देशाच्या तसनिम मिरचा 19-21, 21-17, 21-11 असा पराभव केला. अश्मिताचे हे तिसरे बीडब्ल्यूएफ आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेचे जेतेपद आहे. याआधी तिने इंडिया ओपन इंटरनॅशनल व दुबई इंटरनॅशनल येथील स्पर्धा जिंकल्या आहेत. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत रवीने मलेशियाच्या सूंग जू व्हेनचा 21-19, 21-18 अशा सरळ गेम्सनी पराभव करून जेतेपद पटकावले. महिला दुहेरीत भारताच्या अश्विनी भट व शिखा गौतम यांना अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपद मिळाले. अंतिम फेरीत त्या प्रतिस्पर्ध्यांकडून 22-24, 15-21 अशा पराभूत झाल्या.









