वृत्तसंस्था/ ताश्कंद (उझ्बेकिस्तान)
मंगळवारी येथे झालेल्या आयबीए पुरुषांच्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या टोकियो ऑलिम्पिक मुष्टीयोद्धा आशिष चौधरीने 80 किलो वजन गटात उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
मंगळवारी झालेल्या लढतीत आशिषने इराणच्या मेसाम घेशलागीचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला. मेसामने 2021 च्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. हिमाचलप्रदेशच्या 28 वर्षीय आशिषने मंगळवारच्या या लढतीत आपल्या जबरदस्त ठोश्याच्या जोरावर मेसामला नमवले. 2019 च्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिष चौधरीने रौप्यपदक मिळवले होते. ताश्कंदमधील या स्पर्धेत 107 देशांचे सुमारे 538 स्पर्धक सहभागी झाले आहेत.









