आक्रमक धोरण बदलणार नाही : कर्णधार स्टोक्स, ऑस्ट्रेलियाविरुद्ध धोरणाचा कस लागणे बाकी : स्मिथ
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लिश क्रिकेट संघाच्या आक्रमक ‘बाझबॉल’ धोरणाची अंतिम कसोटी उद्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या अॅशेस मालिकेतून लागणार आहे. ही सर्वांत प्रसिद्ध कसोटी क्रिकेट मालिका पुन्हा एकदा आपले रंग दाखविण्यास सज्ज झाली असून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या मालिकेच्या अंतर्गत पाच सामने खेळविले जाणार आहेत. 1882 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या मालिकेनंतर ज्या ‘अॅशेस’ अत्यंत चुरसपूर्ण झाल्या त्यामध्ये यंदाच्या मालिकेचा समावेश होऊ शकतो.
कर्णधार बेन स्टोक्स आणि ज्यांचे टोपण नाव ‘बाज’ असे आहे ते प्रशिक्षक ब्रेंडन मेकॉलम यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पूर्णपणे आक्रमण करण्याचे धोरण पत्करलेले असून मागील 17 पैकी 12 कसोटी जिंकल्या आहेत. सदैव त्यांनी विजयाचा पाठलाग करण्याचे धोरण पत्करलेले असून अगदी हरण्याची जोखीम असली, तरी त्यापासून ते परावृत्त झालेले नाहीत. गेल्या वर्षभरात इंग्लंडचा एकाही मालिकेत पराभव झालेला नाही. स्टोक्स-मेकॉलमची जोडी जमण्याआधी 17 कसोटींपैकी फक्त एक सामना इंग्लंडला जिंकता आला होता, याचा विचार करता त्यांच्या फॉर्ममध्ये मागील वर्षभरात प्रचंड बदल झाला आहे.

इंग्लंड आता कमकुवत संघाविरुद्ध किंवा विश्वविजेत्यांविरुद्ध खेळत असो, त्यांचे खेळाडू नेहमी झटपट धावा करताना आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना लवकर बाद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना तसेच क्षेत्ररक्षणात आक्रमक डावपेचांचा अवलंब करताना दिसतात. आता त्यांचा सामना नव्याने कसोटीत विश्वविजेते बनलेल्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रविवारी ओव्हलवर झालेल्या ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ते इंग्लंडच्या आक्रमक धोरणाला तोंड देण्यास तयार असल्याचा संदेश दिला आहे.
‘बाझबॉल’ धोरण सुरू झाल्यावर मी सुऊवातीलाच असे म्हटले होते की, ते आमच्या गोलंदाजांविऊद्ध कसे खेळतात हे पाहण्यास मी उत्सुक आहे. त्यांनी साहजिकच इतर काही माऱ्यांविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे, परंतु ते अद्याप आमच्याविऊद्ध खेळलेले नाहीत. त्यामुळे ते पाहणे खूप रोमांचक ठरेल. गेल्या 12 महिन्यांत ते ज्या प्रकारे खेळले आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे परिस्थिती बदलली आहे ते पाहताना मला आनंद झाला आहे. परंतु आमच्याविऊद्ध त्यांची कामगिरी कशी होते ते आम्ही पाहू’, असे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने म्हटले आहे.
धोरण बदलणार नाही : स्टोक्स
इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील काही अविस्मरणीय सामन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्टोक्सने जगातील सर्वोत्तम कसोटी संघाशी सामना असला, तरी इंग्लिश संघ आपल्या धोरणापासून मागे सरणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. ‘कर्णधार म्हणून मी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पत्रकार परिषदेतून किंवा मीडियामधून खेळाडूंवर टीका करणार नाही तसेच मैदानाबाहेर माझ्याकडून किंवा ब्रेंडन मेकॉलमकडून कानउघाडणी केली जाणार नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जण कधी ना कधी अपयशी ठरतोच, त्यामुळे खेळाडूंनी आपल्याला हवी तशी फलंदाजी करणे चांगले ठरेल. केवळ अॅशेस मालिका असल्यामुळे ते बदलणार नाही’, असे स्टोक्सने आपल्या स्तंभात म्हटले आहे.
अॅशेस हे खेळाच्या या शैलीचे प्रदर्शन घडविण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे, असे त्याचे म्हणणे आहे. क्रिकेटच्या भल्यासाठी ही शैली सर्वांकडून पत्करली जाईल, अशी आशा स्टोक्सने व्यक्त केली आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर शुक्रवारपासून सुरू होणारी ही मालिका मागील मालिकेच्या तुलनेत खूप चुरसपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाने 2021-22 मध्ये त्यांच्या भूमीवर झालेल्या मागील मालिकेत इंग्लंडचा 4-0 ने धुव्वा उडविला होता. पहिल्या कसोटीत 9 गड्यांनी (ब्रिस्बेन), दुसऱ्या कसोटीत 275 धावांनी (अॅडलेड), तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि 14 धावांनी (मेलबर्न) आणि पाचव्या कसोटीत 146 धावांनी (होबार्ट) इंग्लंडला पराभूत व्हावे लागले होते. इंग्लंडने सिडनी येथील चौथी कसोटी कशीबशी अनिर्णीत राखली होती. त्यानंतर मेकॉलम आणि स्टोक्सच्या नियुक्त्या झाल्या होत्या.
इंग्लंडसमोर गोलंदाजीत समस्या
इंग्लंडचा सर्वांत यशस्वी गोलंदाज जेम्स अँडरसनला वाटते की, ही मालिका चुरसपूर्ण ठरू शकते. दोन्ही संघ सर्व विभागांमध्ये मजबूत आहेत, असे या 40 वर्षीय वेगवान गोलंदाजाने म्हटले आहे. बेन फोक्सची जागा घेणारा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोने दुखापतीतून सावरून पुनरागमन केल्याने इंग्लंडची फलंदाजी बळकट झाली आहे. शिवाय मोईन अली दुखापतग्रस्त फिरकी गोलंदाज जॅक लीचची जागा घेण्यासाठी निवृत्तीतून बाहेर आल्याने फलंदाजी आणखी मजबूत होण्यास मदत झाली आहे. त्यांना गोलंदाजीच्या विभागात मात्र समस्या आहेत. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ऑली स्टोन यांना दुखापत झालेली असून लीचची अनुपस्थिती हा आणखी एक मोठा धक्का आहे. वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन आणि अँडरसन यांच्याही तंदुरुस्तीबद्दल प्रश्नचिन्ह आहे. स्टुअर्ट ब्रॉड वयाच्या 36 व्या वर्षी प्रत्येक कसोटी खेळण्याची शक्यता नसून अलीकडील दुखापतींमुळे स्टोक्सच्या गोलंदाजी करण्याच्या क्षमतेविषयीही शंका आहेत.
ऑस्ट्रेलियाचा मारा भेदक
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी मजबूत असून त्यांना स्कॉट बोलँडची जोड मिळालेली आहे. गेल्या अॅशेस मालिकेतील कसोटी पदार्पणापासून तो सुधारत गेलेला आहे आणि त्यामुळे कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचा समावेश असलेल्या वेगवान माऱ्याची धार वाढली आहे. ‘आयपीएल’मध्ये दुखापत होऊनही हेझलवूड आता तंदुरुस्त झालेला असण्याची शक्यता आहे. परंतु बोलँडचा फॉर्म पाहता त्याला घाई करण्याची गरज नाही. मार्नस लाबुशेन आणि स्मिथ हे ऑस्ट्रेलियाचे जागतिक कसोटी क्रमवारीतील अव्वल तीन फलंदाजांपैकी दोन खेळाडू आहेत आणि ट्रॅव्हिस हेड इंग्लंडप्रमाणेच ‘बाझबॉल’ पद्धतीने खेळू शकतो. 2019 च्या अॅशेस मालिकेत ब्रॉडने वॉर्नरला सात वेळा बाद केले होते. त्याच्याविरुद्ध वॉर्नर यावेळी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.









