कुंडल / प्रशांत गायकवाड :
कुंडल येथील स्मशानभूमीतून मंगळवारी रात्री दहन दिलेल्या प्रेतांची राख चोरुन नेण्याचा धक्कादायक प्रकार काही तरुणांच्या सतर्कतेने उघडकीस आला. आता ‘स्मशानातील राखेलाही आलाय सोन्याचा भाव’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
त्याचे झाले असे, मागील दोन दिवसात कुंडलमध्ये दोन व्यक्ती मयत झाल्या होत्या. त्यांचे रक्षाविसर्जन बुधवारी होते. मंगळवारी रात्री ८ वा च्या सुमारास कुंडलमधील दोन मित्र आपल्या दुचाकीवरुन कुंडल फाट्याकडे जात असताना स्मशानभूमिमध्ये त्यांना दोन तरुण दिसले. त्यापैकी एकाने पिवळे जर्किन घातलेले तर दुसऱ्याने काळे-पिवळे जर्किंग घातले होते. हे तरुण स्मशानभूमीतील लोखंडी सापळ्याजवळ मयत व्यक्तींची राख भरत होते.
त्याने एका सापळ्याजवळची राख पूर्ण पोत्यात भरलेली व दुसरी भरत होता. गाडीवरुन निघालेल्या दोन तरुणांना शंका आल्यानंतर त्यांनी थांबून त्यांना काय करताय, असे विचारले असता दोघांपैकी राख भरणाऱ्याने स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूने शेतातून भरलेली राख तिथेच सोडून पळ काढला. तर दुसाऱ्याने गाडी घेऊन कुंडलकडील दिशेने पोबारा केला. ही घटना समजताच सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले तिथे पोहोचले. त्यांनी तात्काळ ही घटना पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत पदाधिकारी यांना सांगितली. व अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी संपूर्ण स्मशानभूमी उजळून निघेल, अशी लाईटची व्यवस्था व सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
- मयताच्या मुखामध्ये सोन्याचा मनी का घालतात
मनुष्याने आयुष्यभर जे काही कष्टाने कमविलेले असते. ते जाताना काहीही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. मात्र त्याने कष्टाने कमवून ठेवलेल्या संपत्तीमधून उतराई व्हावे म्हणून व त्याचा पुढील जन्म जो असेल तो समाधानकारक जावा, या हेतुने एक सोन्याचा मनी तोंडात ठेवण्याची परंपरा हिंदु धर्मात आहे.
- सोन्याचे वाढलेले भाव…. अन् राखेची चोरी
स्मशानभूमीमध्ये दहन करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या प्रत्येक मयाताच्या मुखामध्ये हिंदु रितीरिवाजानुसार सोन्याचा मनी घातला जातो. साधारणःत पन्नास ते शंभर मीलीच्या सोन्याच्या मन्याचा दर सहाशे ते एक हजार रुपयांपर्यंत असल्याने एका मयताच्या राखेतून काही मिनिटात हजार रुपयांची कमाई होत असल्याने या भुरट्या चोरट्यांची नजर स्मशानातील राखेकडे वळली आहे.








