सुधाकर काशीद ,कोल्हापूर
Ashadi Ekadashi Wari Vishalgad : या मार्गावरचा पाऊस म्हणजे झिम्माड पाऊस. पावसाबरोबर अंगावर येऊन धडकणारे धुक्याचे ढग, पायाखाली फक्त रबरबीत चिखल, वाटेत ठिकठिकाणी वाहणारे पाण्याचे लोट ,एका बाजूला झाडी तर दुसऱ्या बाजूला पठार आणि टेकड्या. वाटेत कुठे गाव येईपर्यंत बसायचं म्हटलं तर तशी सोयही नाही. यातून वाट काढत हे सर्वजण चालत असतात. रेनकोट अंगावर असूनही आतून ओले चिंब झालेले असतात. पण जय जय जय जय, जय शिवाजी या घोषाबरोबर हा पावसाचा मारा विसरून ते पुढे पुढे जात असतात. कारण यांना ध्यास असतो पावनखिंडीचा. चाळीस वर्षांपूर्वी अशा पावसात जेमतेम चाळीस जण पावनखिंडीत जायचे. आज जवळजवळ दरवर्षी 40हजार जण पावनखिंडीला जातात. आणि फक्त एक मोहीम म्हणून नव्हे तर पावनखिंडीची एक धुवांधार पावसातली वारीच अनुभवतात.
यावर्षीही चाळीस-पन्नास हजार शिवप्रेमी पावनखिंडीला जाणारे स्पष्ट आहे.त्याची तयारी सुरू झाली आहे. सर्वांनीच एका दिवशी जाऊन सर्वांची स्थिती अडचण होऊ नये म्हणून यावर्षी पावनखिंड मोहिमेच्या तारखा वाटून दिल्या गेल्या आहेत. एका वेळी एखाद्या ग्रुप मधून मोठ्या संख्येने येणाऱ्या ग्रुपसाठी या तारखांचे सर्वानुमते नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पन्हाळा ते पावनखिंड हा दऱ्या खोऱ्यांचा मार्ग सलग 20 ते 25 दिवस शिवघोषाने दुमदुमत राहणार आहे. पूर्वी साधारण कोल्हापूर,सांगली,सातारा परिसरातले तरुण या मोहिमेत जास्त संख्येने असायचे.हा त्यात आता पुण्या मुंबईच्या बाहेरूनही तरुणांचे ग्रुप सहभागी होत आहेत. अर्थात या मोहिमेवर कोणाचे तरी नियंत्रण असावे म्हणून कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनिंग असोसिएशनने पावनखिंड संग्राम स्मृती शौर्य मध्यवर्ती समन्वय समिती स्थापन केली आहे. 12 ,13 जुलै हा पावनखिंड संग्रामाचा दिवस असला तरी साधारण दोन जुलै ते वीस जुलैपर्यंत पावनखिंड संग्राम स्मृती मोहीम चालूच राहणार आहे.
पन्हाळगडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सोळाशे साठ साली सिद्धी जोहारने पन्हाळगडाला वेढा घातला.साधारण तीन महिने हा वेढा होता.वेढा ताकतवान असल्यामुळे महाराज पन्हाळगडावर अडकून पडले होते.गडावरचा धान्य व इतर साहित्याचा साठा संपत आला होता.पण शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांचा निर्धार तसुभरही कमी झाला नव्हता. पावसाळ्याचे दिवस, काळोखी रात्र, तुफान पाऊस आणि या निसर्ग संधीचा लाभ घेत 12 जुलैच्या रात्री शिवाजी महाराज वेढा भेदून पन्हाळ्याच्या बाहेर पडले.शिवा काशीद याला प्रति शिवाजी म्हणून चर्चेसाठी पाठवले.तेथे त्याच्या वाट्याला शौर्य मरण आले.आपल्या जीवावर उदार होऊन राजांचा जीव वाचवण्यासाठी कोणतेही संकट अंगावर घेण्यास तयार असलेल्या मावळ्यांनी राजांना एका रात्रीत पन्हाळगडावरून विशाळगडावर नेऊन पोहचवले.त्यावेळी पावनखिंडीच्या परिसरात घनघोर लढाई झाली.बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या सोबतच्या ज्ञात अज्ञात मावळ्यांनी ही खिंड लढवली आणि आपल्या प्राणाची बाजी लावली.
या ऐतिहासिक क्षणाची स्मृती व शौर्यशाली मावळ्यांना वंदन करण्यासाठी गेली 40 वर्षे तरुण-तरुणी पावनखिंडीत जातात.पूर्वी तशी संख्या खूप कमी होती. मार्गही खडतर होता. 12 ,13 जुलै रोजी भर पावसात दोन दिवस चालत राहणे हा कसोटी पाहणारा थरार होता.पण दरवर्षी 12-13 जुलैला पावनखिंड मोहीम सुरू राहिली. आता पंधरा ते वीस मोठे ग्रुप व वैयक्तिक काही ग्रुप असे 40 हजार तरुण-तरुण या मोहिमेत सहभागी होतात.ही मोहीम पन्हाळ्यावरून सुरू होते. मार्गात मसाई पठारावरून पुढे एक मुक्काम करावा लागतो. पूर्वी संख्या कमी असल्याने एखाद्या गावात मुक्कामाची सोय व्हायची.
आता संख्या वाढल्याने मुक्कामाची सोय व्यवस्थित होत नाही.त्यामुळे सर्वांनी 12, 13 जुलै या दिवशीच न येता जुलै महिन्यात वेगवेगळ्या तारखांना मोहिमेचे आयोजन करावे असा मध्यवर्ती समितीत निर्णय झाला. त्यामुळे आता एक जुलैपासून मोहिमा सुरू होणार आहेत. आणि पावनखिंडीचा मार्ग एक महिनाभर शौर्य घोषाने दुमदुमत राहणार आहे.
सोयीसाठी नियोजन…
पावनखिंडीचे शौर्य म्हणजे इतिहासातले एक शौर्यशाली असे पर्व आहे. पावनखिंड परिसरात ही लढाई झाली. या शौर्याची स्मृती जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. पण त्यामुळे पावनखिंड परिसरात एकाच वेळी गर्दी होऊ नये. नियोजन विस्कळीत होऊ नये म्हणून या वर्षीपासून सर्वांच्या सोयीचे नियोजन केले आहे.
अमर आडके,मध्यवर्ती समन्वय समिती
शहारे आणणारी मोहिम….
पावनखिंडीच्या शौर्याचा इतिहास वाचताना आजही अंगावर शहारे येतात. काही आधुनिक सुविधा जरूर झाल्या. पण पावनखिंडीला अजूनही डोंगर ,दऱ्या जंगल , तुंडुब झरे यांची साथ आहे . झिम्माड पाऊस आणि धुके आहे. अशा वातावरणात त्या शौर्याला, त्या मावळ्यांना वंदन करण्याच्या मोहिमेला आता शौर्य वारीचे स्वरूप आले आहे.
प्रमोद पाटील, हिल रायडर्स हायकर्स
इव्हेंटचे स्वरूप नको…
मोहिमेत तरुण-तरुणींची संख्या वाढली आहे . ही मोहीम इव्हेंट होऊ नये याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. बहुतेक तरुण-तरुणी इतिहासाची स्मृति म्हणूनच या मोहिमेत सहभागी होतात. पण काहीजण पॅकेज टूर म्हणून पावनखिंड मोहिमेचे आयोजन करत आहेत ही अनावश्यक प्रथा बंद झालीच पाहिजे. व पावनखिंड परिसरात इतिहासाचीच स्मृती जागली गेली पाहिजे.
भगवान चिले, निसर्गवेध.