मुंबई\ ऑनलाईन टीम
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. आज, मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पहाटे विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणार आहेत.
आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करतील. केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.
आषाढी यात्रेसाठीआजपासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आषाढीसाठी काही मानाच्या पालख्यांचं पंढरीकडे प्रस्थान झालं आहे तर काही वेळात उर्वरित पालख्याही पंढरीच्या दिशेनं रवाना होतील. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या वर्षांपासून एसटी बसनं या मानाच्या पालख्या पंढरपूरला येत आहेत. गेल्या वर्षभरापासून राज्यभरात कोरोनाचं सावट पसरल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी राज्य सरकारने पंढरपूरकडे जाणाऱ्या वाऱ्या आणि पालख्या यांच्यावर निर्बंध लावले आहेत. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारने राज्यातील पायी वारी करण्यावर निर्बंध लावले आहेत, मात्र मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे.
Previous Article…मुंबईत अशी परिस्थिती उद्भवतेच कशी? : आशिष शेलार
Next Article साईपर्ण कंपनीतील चोरीप्रकरणी 5 अटकेत








