दिवसभर विविध भरगच्च कार्यक्रम : विविध ठिकाणाहून येणार दिंड्या
पणजी : गोव्यातील साऱ्या दिंड्या आज सांखळी येथील श्री विठ्ठल मंदिराकडे येणार आहेत. गोव्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांखळीमध्ये आज आषाढी एकादशी निमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रम होणार असून सकाळपासून दुपारपर्यंत श्री विठ्ठल रखुमाईवर भाविकांतर्फे दुग्धाभिषेक होणार आहे. गोव्यातील जनता आज आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करणार आहे. गोव्यातील विविध विठ्ठल मंदिरात या निमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. पणजी, फोंडा, ताळगाव, पानवेल, रायबंदर, सांगे, मडगाव, कुंभारजुवे, म्हापसा, मांद्रे, मये, इत्यादी अनेक विठ्ठल मंदिरामध्ये आज यानिमित्त सकाळपासूनच भाविक श्री विठ्ठलावर अभिषेक करतील. मुख्य सोहळा विठ्ठलपूर सांखळी येथील श्री विठ्ठल मंदिरात होणार असून आरोग्यमंत्री विश्वजित राणे सकाळी महाअभिषेक करणार आहेत. तद्नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोंद सावंत तसेच अनेक नागरिक श्री विठ्ठलावर महाअभिषेक करणार आहेत. सांखळी येथे आज मोठ्या प्रमाणात विविध भागातील भक्त मंडळी दिंड्या घेऊन श्री विठ्ठल मंदिराकडे येणार आहेत. यंदाच्या उत्सवाला अलोट गर्दी होण्याची शक्यता असून मंदिर व्यवस्थापनाने भाविकांच्या सोयीसाठी मंडप उभारलेला आहे. यंदा सुमारे 50 ते 60 पेक्षाही जास्त दिंड्या घेऊन गोव्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मंडळी सांखळीत येणार आहे. वाहनांची गर्दी व वाढते भाविक यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी देखील आपली कुमक तिथे पाठविण्याचे ठरविले आहे.









