हुपरी,प्रतिनिधी
Kolhapur News : वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात हुपरी शहरातील रजत एज्युकेशन सोसायटीमध्ये विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षक ठरले.
हुपरी(ता. हातकणंगले) येथील दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रजत एज्युकेशन सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी देखील आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे वेश परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते.
शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच वारी प्रमाणेच रिंगण देखील आयोजन करण्यात आले. मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपुराच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. विद्यार्थी आणि शिक्षकांनी पारंपारिक वारकरी वेशभूषा तुळशी व भगवद्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली. रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाची भजने गात दिंडी विठ्ठल मंदिराकडे रवाना झाली. तेथे कुमार भोसले व परिवार यांच्याकडून बुंदी लाडूचा प्रसाद देण्यात आला.
रजत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दीपक गाट यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी रजत एज्युकेशन सोसायटीचे संचालक अमोल गाट , सुनील पी. गाट ,सुनील व्ही. गाट, देवयानी माळी , मुख्याध्यापक श्रुती सहस्त्रबुद्धे सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ विद्यार्थी , विद्यार्थिनी ,पालक मोठया संख्येने उपस्थित होते.









