वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
‘श्री विठ्ठल विठ्ठल गजरी’ ‘अवघी दुमदुमली पंढरी’ च्या जयघोषात श्री विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये गुरुवारी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. या निमित्ताने मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई केली होती. भाविकांची दर्शनासाठी लागलेली लांब रांग व विठ्ठल नामाचा जयघोष या वातावरणामुळे कंग्राळी किर्यात भागामध्ये प्रतिपंढरी अवतरल्याचा भास होत होता. गुरुवारी पहाटे पाच वाजता काकड आरती व महापूजा झाली. यावेळी हभप गोपाळ पाटील (गुरुजी) व हभप बसवंत मंगाणाचे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीचे पूजन करण्यात आले. हभप मल्लाप्पा निलजकर व हभप प्रकाश पवार यांच्या हस्ते ज्ञानेश्वर, तुकाराम मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर कंग्राळी, यमनापूर, गौंडवाड, शाहूनगर, किर्यात भागातील भाविकांनी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले.
वसुंधरा इंग्लिश शाळेत दिंडी
आषाढी एकादशीचे औचित्य साधून वसुंधरा इंग्लिश माध्यम शाळेतील बालचमूंची संतांच्या वेषातील दिंडी लक्षणीय ठरली. दिंडी संपूर्ण गावभर फिरून श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात सांगता करण्यात आली. दिंडीमध्ये शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.
विविध कार्यक्रम
आषाढी एकादशीनिमित्त रात्री श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरमध्ये नामजप व भजन आणि हभप गोपाळ पाटील (गुरुजी) यांचे प्रवचन पार पडले. यावेळी हभप महेश अष्टेकर, गजानन पाटील, अनिल कडोलकर, शंकर बसरीकट्टी, वारकरी, सांप्रदायातील सदस्य उपस्थित होते.









