आषाढी एकादशी भक्तिभावाने : मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तन : टाळ-मृदंगाच्या गजरात बालचमूंच्या दिंड्या
वर्ताहर / किणये
पंढरीची वारी आहे माझी घरी ! आणिक न करी तीर्थव्रत !
व्रत एकादशी करीन उपवासी !
गाईन अहर्निशी मुखी नाम !
नाम विठोबाचे घेईन मी वाचे !
बीज कल्पतींचे तुका म्हणे !
या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथील लाखो वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्कट आविष्कार पंढरीच्या दिंडीतून दिसून येतो. लाखो भक्तांचे पंढरपूर हे श्रद्धास्थान आहे. पंढरीची वारी नित्यनेमाने वारकरी करतात. केवळ सावळ्या विठ्ठलाचे दर्शन हाच त्यांच्या वारीचा मुख्य उद्देश असतो. याचीच प्रचिती गुरुवारी तालुक्यात दिसून आली. आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण तालुका विठ्ठलाच्या गजरात दुमदुमला होता. तालुक्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध गावांतील विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये गुरुवारी पहाटेपासूनच विठूनामाचा गजर सुरू होता. मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. काही गावांमध्ये बालचमूंनी टाळ, मृदंगाच्या गजरात दिंड्या काढल्या.
पंढरपूरला गुढी नेण्याचा हेतू
वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा टिकविण्यासाठीची आस वारकऱ्यांमध्ये दिसून येते. वारी ही भक्ती आणि प्रेमाची अनुभूती घेण्याची स्थिती आहे. ‘माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेई गुढी’ याप्रमाणे पंढरपूरला जाण्याची आस संतांना असते. पंढरपूरला गुढी नेण्याचाही या संतांचा मुख्य हेतू असतो. पंढरपूरच्या विठ्ठल भेटीची व दर्शनाची ओढ सर्वांनाच लागली होती. यामुळेच पंधरा दिवसांपासून तालुक्यातून पायी दिंड्यांचे पंढरपूरला प्रस्थान झाले होते. दोन-तीन दिवसांपूर्वीच या दिंड्या पंढरपूर नगरीत दाखल झाल्या होत्या.
ऊन-पावसाची तमा न बाळगता पंढरपुरात
पंधरा दिवस ऊन-पावसाची तमा न बाळगता देहभान विसरून विठ्ठलाचा जयघोष करीत वारकरी पंढरपुरात दाखल झाले. एकादशीच्या दिवशी सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ‘हा आनंद सुख सोहळा स्वर्गी नाही’ असेच त्यांनी बोलून दाखविले. तालुक्याच्या विविध गावांमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरांमध्ये गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंदिरांना आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविक दिवसभर विठ्ठलाचे दर्शन घेताना दिसत होते. गावांमध्ये हरिपाठाचा कार्यक्रम आयोजिला होता. काकड आरतीचा गजर झाला, भजन प्रवचनही झाले. अनेक गावांतील वारकरी पायी दिंड्यांमधून पंढरपूरला गेले आहेत. काही जण चार-पाच दिवसांमध्ये टेम्पो, रेल्वेतून पंढरपूर नगरीत दाखल झाले आहेत. भक्तांनी ‘पंढरीचा वास चंद्रभागा स्नान’ असे म्हणत चंद्रभागेमध्ये स्नान केले. गुरुवारी आषाढी एकादशीचा उपवास भक्तांनी केला होता. बेळगुंदी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात पहाटे काकडारती झाली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. यावेळी महिला आरती घेऊन उपस्थित होत्या.
दिवसभर विविध कार्यक्रम
खादरवाडी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर कमिटीतर्फे विठ्ठल रखुमाई मंदिर व तुकाराम महाराज मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा झाला. पहाटे 5 वाजता काकड आरतीनंतर विधिवत पूजा-अर्चा झाली. दिवसभर विविध कार्यक्रम झाले. रात्री 9 वाजता महाआरती झाली. त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. पिरनवाडी येथील रामदेव गल्लीतील बालकांनी विठ्ठल, संत तुकाराम, मुक्ताई, ज्ञानेश्वर माऊली यांच्या वेशभूषा परिधान करून दिंडी काढली. यावेळी त्यांनी विविध अभंग व भजने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. नागरिक ठिकठिकाणी बालकांच्या या दिंडीचे जल्लोषात स्वागत करत होते. किणये गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिर व महालक्ष्मी मंदिरात काकडारती झाली. त्यानंतर दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. दिवसभर भजन व प्रवचन कार्यक्रम झाले. बहाद्दरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात ब्रह्मलिंग पिंडीची विशेष पूजा करण्यात आली. पहाटे काकड आरती व रात्री जागर भजन झाले. नावगे, वाघवडे, जानेवाडी, बाळगमट्टी, बामणवाडी, कर्ले, बिजगर्णी, बेळवट्टी, इनाम बडस, राकसकोप, सोनोली, बोकमूर, बाकनूर, मंडोळी, सावगाव, बेनकनहळ्ळी गावांमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.









