खानापूर : शहरासह तालुक्यातील गावोगावी विठ्ठल मंदिरांतून एकादशी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच सकाळी काकड आरती झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर अभिषेक घालून पूजा करण्यात आली. तालुक्यातील मंदिरांतून दिवसभर भजन सोहळा सुरू होता. शहरातील विठ्ठल मंदिर आणि ज्ञानेश्वर मंदिरात अभिषेक, पूजा करण्यात आली. परंपरेप्रमाणे विठ्ठल मंदिराच्या पालखीची विठ्ठल मंदिर, निंगापूर गल्ली, राजा छत्रपती चौक, पारिश्वाड क्रॉस, जुना मोटारस्टँड, मलप्रभा नदीघाट, राम मंदिर ते विठोबा मंदिर अशी पालखीची नगरप्रदक्षिणा झाली. शुक्रवार दि. 11 रोजी प्रतिपदेला दहीकाला करण्यात येणार असून यानंतर शहरातून विठ्ठल रखुमाईची पालखी काढण्यात येते. या पालखीवर चिरमुरेचे लाडू उडवण्याची प्रथा आहे.
तालुक्यात गावोगावी वारकरी सांप्रदाय मोठ्याप्रमाणात असल्याने ग्रामीण भागातून शेकडो दिंड्या एकादशीनिमित्त पंढरपूरला गेल्या आहेत. सोमवारी द्वादशीनंतर पुढील चार दिवस वारकरी पंढरपूरहून परत येणार आहेत. यानंतर गावोगावी ममदे कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यावेळी ज्ञानेश्वरी मंदिरात सौ. व श्री. अमित पडोळकर यांच्या हस्ते अभिषेक, पूजा करण्यात आली. तर विठ्ठल मंदिरात परंपरेप्रमाणे अभिषेक, पूजा करण्यात आली. गुरुवारी विठ्ठल मंदिरातील पालखीची नगरप्रदक्षिणा शहरातून काढण्यात येते. यावेळी ज्ञानेश्वर मंदिरात सागर पाटील, संतोष परमेकर, हरिभाऊ वाघधरे, पुंडलिक खडपे, मनोज रेवणकर, रॉकेश बेळगुंदकर यासह भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कुप्पटगिरीत दिंडी सोहळा
आषाढी एकादशीनिमित्त कुप्पटगिरी येथे विठ्ठल मंदिरात पहाटे अभिषेक, पूजा आणि नामसंकीर्तन झाल्यानंतर प्रथेप्रमाणे दिंडी आणि पालखी सोहळा काढण्यात आली. विठ्ठल मंदिरातून या दिंडीला सुरुवात होऊन गावातून फिरुन मलप्रभा नदी काठावरील पुंडलिक मंदिरात जावून भेटीगाठी झाल्यानंतर पुन्हा पालखी मंदिरात आणण्यात येते. गेल्या 88 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे.









