ग्रीष्म ऋतूला अगदी पार वेशीच्या बाहेर घालून वर्षा ऋतूला मार्गस्थ करणारा महिना म्हणजे आषाढ. उत्तराषाढा नक्षत्राचा महिना म्हणजे हा आषाढ या शब्दाचा अर्थ आहे ‘सिंह’ त्याच्यासारख्या गर्जना करत येणारे काळे ढग उन्मत्त हत्तीसारखे वाटतात. जणू वाऱ्याचा आसूड पाठीवर झेलतांना पाण्याच्या पिशव्या फुटतात आणि जोराच्या आवेगाने, आवेशाने वर्षाधारा बनून पृथ्वीच्या पोटात पटकन जाऊन शिरतात. जणू सांगत असतात आता खूप खूप पिकांच्या रुपात तुम्हाला भरपूर उत्पन्न आम्ही देत राहणार आहोत. असं जरी असलं तरी मनाला एक प्रकारची हुरहुर लावणारी भावावस्था या महिन्यात प्रकर्षाने जाणवते. कोणाची तरी वाट पाहणारे मन पावसाच्या मोत्यांच्या पडद्यापलीकडे काही दिसते का? म्हणून बघत बसते. बहुतेक हीच भावावस्था कालिदासाने अनुभवली असावी आणि मेघदुताचा रमणीय प्रवास सुरू झाला असावा.
‘रामगिरीवर विरही शापित यक्ष थांबला एक…
दिसे तयाला कड्यास भेटे कृष्ण सावळा मेघ…
फुले कड्याची उधळीत बोले तूच दूत रे खास…
आषाढाच्या पहिल्या दिवशी यक्ष वदे मेघास’
राजेंद्र दातार यांची ही कविता वाचली आणि मेघदुताचे चित्र डोळ्यासमोर आले. एका शापित यक्षाला शाप मिळून तो पृथ्वीवर आला परंतु पत्नीच्या विरहाने व्याकुळ झाला. या विरह अवस्थेत जगणारा यक्ष आपल्या पत्नीपर्यंत ही भावावस्था पोहोचवण्यासाठी आषाढ मेघाची निवड करतो आणि आपला निरोप धाडतो. 111 श्लोकांचे काव्य पूर्वमेघ आणि उत्तर मेघ या दोन स्तरावर लिहिणारा कालिदास मध्य भारतातील रामगिरी म्हणजेच रामटेक वरून हिमालयातल्या अल्कानगरीपर्यंतचा गुगल मॅपच जणू या यक्षाच्या समोर शब्दरूपात मांडतो. या शब्दांचे वैभव लिहून हा महिना आपल्या नावावर करणारा कालिदास आणि त्याचे हे काव्य मेघदूत साऱ्या साहित्य क्षेत्रालाच आपल्याभोवती रुंजी घालायला लावतात. शब्दांचे सामर्थ्य चित्रमय शैली आणि अलंकार वृत्तांनी सजलेलं हे शब्दांची जणू वारीच आपल्याला घडवतं. हिमालयातल्या शुभ्र परब्रम्हापर्यंत घेऊन जातं. आपल्याला कळतच नाही, हा प्रवास इतका सुंदर आणि देखणा कसा झाला ते. इकडे मात्र पंढरपूरच्या ओढीने विठ्ठलाचे निरनिराळ्या प्रांतातले भक्त आषाढात देव निजायच्या आधी देवाच्या भेटीला निघतात. मेघदुताच्या प्रवासासारखा देखणा प्रवास ते देखील अनुभवत असतात. ज्ञानोबा तुकाराम यांच्या पालख्या अठरा दिवसांसाठी चालत असतात. आषाढ सरींनी चिंब भिजत आनंदघन होत असतात. खरंतर 18 दिवसांनी येणारा चातुर्मास देवाच्या विश्रांतीचा काळ. सूर्यदेखील आपला मार्ग बदलतो. सगळे गृहमालेतील ग्रह वेगवेगळ्या दिशांनी आपली पालखी सुरू ठेवतात. खरंतर आपल्या प्रत्येकाचीच कुठलीतरी परिक्रमा सुरू असते. तशी ही विठ्ठलाच्या पालखीचीसुद्धा एक परिक्रमा. तिकडे सिंहांची मेघगर्जना, तिकडे मेघांची सिंहगर्जना आणि इकडे वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाचा घोष सगळा आसमंत दणाणून जातो. आषाढातल्या या सगळ्या बदलांमुळे जीव जंतूमुळे साथीचे रोग आजारपण आमच्या इथे मुक्कामाला आलेलेच असायचे. पूर्वीच्या काळी दवाखाने डॉक्टर फार नसले तरी आमच्या गावाचं ग्रामदैवत एखादी मरीआई, लक्ष्मी आई, शितळादेवी यासारखे देव या रोगराईचा गाडा ओढायचेच. त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जायचा, गोड पुऱ्या, शंकरपाळी किंवा पुरणपोळी यासारखे नैवेद्य प्रत्येक घराघरात व्हायचे. यालाच आषाढ तळणे असे म्हटले जाते. अशा या महिन्यात प्रत्येकाच्या जगण्याची परिक्रमा चालू असतेच. वरून खाली, खालून वर सगळं काही गोलाकार. मार्गावरून पालख्या मिरवत असतात तर काही पाण्याच्या धारा जमिनीमध्ये जिरवत असतात. आषाढाचे मार्ग मात्र आमच्या जगण्याला आश्वस्त करत असतात.








