आरोग्य खात्याकडून आश्वासन : जि. पं. मध्ये बैठक : यापुढे समस्या उद्भवणार नाहीत याची दखल घेणार
बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांकडून जिल्हा पंचायतीवर दि. 18 रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. याला प्रतिसाद देत जिल्हा पंचायतीकडून जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा आरोग्य खाते व आशा कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेऊन मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासन देण्यात आले. तर वेतनातील होणारी तफावत दूर करून यापुढे समस्या उद्भवणार नाहीत, याची दखल घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
वेळेत वेतन व गौरवधन देण्याकडे दुर्लक्ष
जिल्हा पंचायतीमध्ये आरोग्य खाते, आशा कार्यकर्त्या संघ यांची बैठक बोलविण्यात आली होती. आशा कार्यकर्त्यांकडून जिल्हा पंचायतीला सादर केलेल्या निवेदनानुसार त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. 15 हजार मासिक वेतन देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. यावरही बैठकीमध्ये चर्चा झाली. विशेष करून आशा कार्यकर्त्यांकडून आरोग्य खात्याशी संबंधित असणारी अनेक कामे घरोघरी जाऊन केली जातात. आरोग्य खात्याच्या योजना घरोघरी पोहोचविण्यात आशा कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका असते. असे असले तरी आशा कार्यकर्त्याना वेळेत वेतन व गौरवधन देण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तांत्रिक समस्येमुळे केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली.
वेगवेगळ्या कारणांतून वेतन कपात
वेगवेगळ्या कारणांतून आशा कार्यकर्त्यांचे वेतन कपात करण्यात येत आहे. हे बंद करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी यापुढे अशी कोणतीच तक्रार होऊ देणार नाही. वेतनामध्ये होणारे तांत्रिक दोष लवकर निवारण केले जातील. ज्या आशा कार्यकर्त्यांचे वेतन तांत्रिक कारणामुळे थकले आहे. याबाबत सखोल तपासणी करून वेतन देण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले. वेतन थकलेल्या आशा कार्यकर्त्यांची यादी देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. तर 2019-20 मधील कोरोना काळातील गौरवधन देण्यात आलेले नाही, अशी तक्रार आशा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली तर आरोग्य खात्याकडून वेतन अदा करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. मात्र आशा कार्यकर्त्यांना वेतन मिळाले नसल्याची तक्रार डी. नागलक्ष्मी यांनी केली. या वेतन प्रक्रियेची पडताळणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तीन महिन्याला एकदा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान आरोग्य खात्याचे जिल्ह्यातील तालुका अधिकारी, जिल्हा सर्जन विठ्ठल शिंदे, आरसीएचओ डॉ. चेतन कंकणवाडी आदी अधिकारी, आशा कार्यकर्त्या संघाच्या प्रमुख उपस्थित होत्या.
तीन महिन्याला एकदा होणार बैठक
आशा कार्यकर्त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. समस्यांचे निराकारण व्हावे, यासाठी प्रत्येक तीन महिन्याला आरोग्य खाते व आशा कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात यावी. या माध्यमातून समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी आशा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. याला आरोग्य खाते व जिल्हा पंचायतीकडून संमती देण्यात आली आहे.









