सांगली :
येथील सुप्रसिद्ध चित्रकार आशा अनिल फडतरे यांच्या ‘पताके’ या नव्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ११ ते १८ ऑगस्ट दरम्यान रसिक प्रेक्षकांसाठी खुले आहे.
‘पताके’ या संकल्पनेवर आधारित चित्रमालिकेतून आशा फडतरे यांनी पताक्यांच्या हालचाली, रंगांची स्फूर्ती, आणि सांस्कृतिक लयबद्धता यांचा एकात्मीय अनुभव सादर केला आहे. सभासमारंभ, जत्रा, उत्सव यांमधील डोलणाऱ्या रंगीबेरंगी पताक्यांचे दृश्य, त्यांची उर्जा आणि गतिमानता ही चित्रमालेची केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या मते, ‘पताक्यांच्या हालचालीचा हा खेळच अलीकडे दिनक्रम झालाय.’
आशा फडतरे यांचा चित्रकलेतील प्रवास २० वर्षांहून अधिक आहे. त्यांनी आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त अमूर्त चित्रकृती, ऑईल पोर्टेट्स, फायबर शिल्प, आणि वॉल पेंटिंग्स साकारल्या आहेत. त्यांचे शिक्षण कलाविश्व आणि रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स मधून झाले असून त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
‘पताके’ चित्रमालिकेत खास करून वारली शैलीची प्रेरणा आणि लाल रंगाचे प्रभावशाली वापर, हे लक्षवेधी घटक आहेत. लहान आकृत्यांमधून सामाजिक, सांस्कृतिक, आणि दृश्य अनुभवांची मांडणी त्यांनी प्रभावीपणे केली आहे. हे चित्रण सोप्या भाषेतून खोल अर्थ पोहोचवते.
त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं, ‘चित्र पूर्ण होतं की अपूर्ण राहतं हे महत्त्वाचं नाही; चित्राची भाषा जगण्यातून येते.’ या चित्रप्रदर्शनात ही भावनाच सर्वत्र अनुभवता येते.
कला रसिकांनी ‘पताके’ हे प्रदर्शन नक्कीच अनुभवावे, कारण हे केवळ चित्रांचे नव्हे, तर एका सतत गतिमान प्रक्रियेचे दर्शन घडवणारे प्रदर्शन आहे.








