तिसरी मंजिल, दो बदन, कटी पतंगचे प्रदर्शन : आशा पारेख महोत्सवात सहभागी होणार
प्रतिनिधी / पणजी
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख आपल्या अभिनय आणि चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. आपल्या सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाने लोकांच्या हृदयात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांद्वारे त्या यंदाच्या इफ्फीत झळकणार आहेत. याशिवाय चित्रपट महोत्सवातही त्या सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. त्यामुळे सिनेरसिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱया 53 व्या आंचिममध्ये आशा पारेख यांचे तिसरी मंजिल, दो बदन आणि कटी पतंग हे तीन चित्रपट दाखवून अनोख्या पद्धतीने गौरव केला जाणार आहे. या चित्रपटांतून त्यांच्या कारकीर्दीकडे एक दृष्टीक्षेप टाकण्यात येणार आहे. 60 आणि 70च्या दशकातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आशा पारेख यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱया या अभिनेत्रीने 95 हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरवर्षी दादासाहेब फाळके रेट्रोस्पेक्टीव्ह विभागात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित कलाकारावर आधारित चित्रपट दाखविले जातात. यंदा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित आशा पारेख यांचे चित्रपट दाखविले जाणार आहेत.
सिनेमाची समृद्ध परंपरा असलेल्या अर्जेंटिनाचे इफ्फीत सात निवडक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. रॉड्रीगो ग्युरेरो दिग्दर्शित ‘सेव्हन डॉग्ज’ आंचिममध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट सुवर्ण मयूराच्या शर्यतीत आहे. ऍंड्रिया ब्रागा दिग्दर्शित ‘सेल्फ डिफेन्स’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट पदार्पण वैशिष्टय़ाच्या पुरस्काराच्या स्पर्धेत आहे. याशिवाय या महोत्सवात प्रदर्शित होणारे इतर अर्जेंटिनियन चित्रपट मिस विबोर्ग, द बॉर्डर्स ऑफ टाइम, द सबस्टिटय़ूट, रोब ऑफ जेम्स, आणि इआमी दाखविले जाणार आहेत.












