विविध मागण्यांसाठी राज्य सरकारवर आणणार दबाव : जिल्हाधिकारी कार्यालय आवारात करणार निदर्शने
बेळगाव : राज्य सरकारकडून आशा कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात येत आहे. मुख्यमंत्री हे दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे आशा कार्यकर्त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आपल्या विविध मागण्यांसाठी 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आशा कार्यकर्त्या अहोरात्र आंदोलन करणार आहेत, अशी माहिती आशा कार्यकर्त्या संघटनेच्या राज्य सचिव डी. नागलक्ष्मी यांनी दिली. कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
नागलक्ष्मी पुढे म्हणाल्या, जानेवारीमध्ये आशा कार्यकर्त्यांकडून बेंगळूर येथील फ्रिडम पार्कमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाची दखल घेऊन स्वत: मुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कांही दिवसांपूर्वी अंगणवाडी कार्यकर्त्यां, मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना 1 हजार रुपयांचे वाढीव प्रोत्साहन धन देण्यात आले होते. राज्यात 42 हजार आशा कार्यकर्त्या कार्यरत असूनदेखील सदर प्रोत्साहन धन देण्याची तरतूद केली नाही, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनासह केंद्र सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन धन व्यतिरिक्त मासिक 10 हजार रु. वेतन देण्यात यावे, असा आदेश जारी करावा. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात सर्व अंगणवाडी व मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना जसे 1 हजार प्रोत्साहन धन वाढविण्यात आले होते. त्याचप्रमाणे आशा कार्यकर्त्यांनाही देण्यात यावे, विनाकारण कोणत्याही आशा कार्यकर्त्यांना कामावरून काढू नये. निवृत्त आशा कर्मचाऱ्यांना प. बंगालच्या धर्तीवर फंड देण्यात यावा. शहरी आशा कर्मचाऱ्यांचे मानधन 2 हजार रुपयांपर्यंत वाढवून देण्यात यावे, असे त्या म्हणाल्या.
7 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन तात्काळ लागू करावे. आशा कार्यकर्त्यांना ऑनलाईन नोंदणीच्या ठिकाणी नाहक त्रास देऊ नये. आधीच आशा कार्यकर्त्यांना आरोग्यासह विविध विभागात काम करावे लागते. मात्र आता त्यांच्यावर तीन-चार गावांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येणार असल्याचे समजते. आशा कार्यकर्त्या अनेक संकटांचा सामना करत शासनाची सर्व कामे प्रामाणिकपणे करीत असतात. पण त्यांच्या मागण्यांकडेच दुर्लक्ष करण्यात येत असल्याने 12 ते 14 ऑगस्ट असे तीन दिवस अहोरात्र आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी लक्ष्मण जडगण्णवर, गीता रायगोळ, रुपा अंगडी, रिटा फर्नांडिस, जयश्री नावी आदी उपस्थित होते.









