शेकडो आशा कार्यकर्त्यांचा सहभाग
बेळगाव : दहा हजार मानधन व अन्य मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात चालविलेल्या अहोरात्र आंदोलनाचा बुधवारी दुसरा दिवस होता. बुधवारच्या आंदेलनातही शेकडो आशा कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आशा कार्यकर्त्यांनी जानेवारी महिन्यात बेंगळूरच्या फ्रीडम पार्कमध्ये केलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. 7 महिने उलटले तरी मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी त्यांची मागणी आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहन धनाव्यतिरिक्त किमान मासिक 10 हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश जारी करावा. यंदाच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी व मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना 1 हजार रुपये प्रोत्साहनधन देण्यात आले होते. आशा कार्यकर्त्यांनाही 1 हजार रुपये प्रोत्साहनधन देण्यात यावे, निवृत्त कार्यकर्त्यांना फंड देण्यात यावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.









