ट्रान्स्फॉर्मरखाली बसून भाजी, कपडे, इतर साहित्य विक्री करणाऱ्यांवर निर्बंध कोण आणणार? : पोटासाठी पत्करताहेत धोका

बेळगाव : शहरात विद्युत ट्रान्स्फॉर्मरखाली बसून साहित्याची विक्री करणारे विक्रेते सर्रास दृष्टीस पडतात. परंतु, हा जीवघेणा खेळ असून विद्युततारेचा चुकूनही स्पर्श झाल्यास आपण जीवानिशी जाऊ शकतो, याची त्यांना पुसटशीही कल्पना नसते. हेस्कॉमकडून वेळोवेळी या विक्रेत्यांना इशारा देऊनदेखील विक्रेते पुन्हा ट्रान्स्फॉर्मरखाली बसूनच भाजी, कपडे व इतर साहित्य विक्री करत आहेत. यावर निर्बंध कोण आणणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टेंगिनकेरा गल्ली येथे ट्रान्स्फॉर्मरशेजारी भाजीविक्री करणाऱ्या महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. निष्पाप महिला जीवाला मुकल्यानंतर आता तरी विक्रेते सावधगिरी बाळगणार का? असा सवाल जनतेतून विचारण्यात येत आहे. सोमव्वा काडरुद्रण्णावर या महिलेला विद्युतभारित तारेचा स्पर्श झाला आणि तिचा मृत्यू झाला. अजून असे किती बळी गेल्यानंतर छोटे विक्रेते व नागरिकांना जाग येणार? असे विचारले जात आहे.

बेळगाव ही व्यापारी पेठ असल्यामुळे चांगला व्यवसाय येथे होतो. विशेषत: बाजारपेठेतील गल्ल्यांमध्ये जागा मिळेल तिथे विक्रेते ठाण मांडतात. भाजी, फळे, गृहोपयोगी साहित्य, कपडे, पादत्राणे यांची विक्री करणारे विक्रेते लहान जागेतही आपला व्यवसाय मांडतात. बऱ्याचवेळा विद्युत ट्रान्स्फॉर्मरखाली जागा शिल्लक असल्याने जीव मुठीत घेऊन येथे व्यवसाय केला जातो. ट्रान्स्फॉर्मरमधून बऱ्याचवेळा आगीच्या ठिणग्या, ऑईल गळत असते. त्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता असतानाही पोटासाठी व्यवसाय करण्याचा धोका पत्करला जातो. शहरातील काकतीवेस, शनिवार खूट, खडेबाजार, समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, मेणसी गल्ली, भातकांडे गल्ली, कांदा मार्केट, रविवारपेठ, कोतवाल गल्ली, कसाई गल्ली, माळी गल्ली, कामत गल्ली आदी भागांमध्ये ट्रान्स्फॉर्मरखाली अथवा शेजारी अनेक विक्रेते साहित्याची विक्री करीत आहेत. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आता तरी या विक्रेत्यांना जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनपाला काहीच देणे-घेणे नाही का?
महानगरपालिकेकडून बैठ्या विक्रेत्यांकडून भूभाडे वसूल केले जाते. आपला माल विक्री करण्यासाठी ते कोठे बसले आहेत, याच्याशी त्यांचे काहीच देणे-घेणे नसते. विक्रेत्याचा जीव गेला तरी चालेल पण आपल्या पदरात भूभाडे पडले पाहिजे, ही भूमिका मनपाची आहे. जर धोकादायक ठिकाणी विक्री करणाऱ्यांना बसूच दिले नाही तर भविष्यात अशा घटना टाळल्या जातील. त्यामुळे महानगरपालिका, हेस्कॉम व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या काम करणे गरजेचे आहे.
कठोर कारवाई करण्याची गरज
टेंगिनकेरा गल्ली येथे घडलेली घटना ही नक्कीच दुर्दैवी आहे. मनपाच्या पथदीप विभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. आम्ही शहरातील अनेक विक्रेत्यांना ट्रान्स्फॉर्मरखाली अथवा शेजारी विक्रीसाठी न बसण्याची सूचना करूनही त्या पाळल्या जात नाहीत. त्यामुळे भविष्यात कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
– विनोद करुर (साहाय्यक कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)









