उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन
वृत्तसंस्था/ जोधपूर
जोधपूर आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामबापूंना राजस्थान उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन कालावधी 1 जुलैपर्यंत वाढवला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना यापूर्वी दिलेल्या जामीन आधाराच्या संदर्भात त्यांना पुन्हा दिलासा देण्यात आला आहे. न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार यांच्या नेतृत्त्वातील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी यासंदर्भात निवाडा देताना सर्वोच्च न्यायालयाच्या अटी जशा आहेत तशाच लागू राहतील, असे स्पष्ट केले आहे.
आसारामबापूंना यापूर्वी मिळालेल्या अंतरिम जामिनाची मुदत 31 मार्च रोजी संपली होती. त्यानंतर त्यांनी 1 एप्रिल रोजी जोधपूर तुरुंगात आत्मसमर्पण केले. मात्र, त्याच रात्री 11:30 वाजता त्यांना आरोग्यम या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 3 एप्रिल रोजी एम्समध्ये तपासणी केल्यापासून ते त्याच रुग्णालयात परतले असून तिथेच दाखल आहेत.
यापूर्वी 28 मार्च रोजी गुजरात उच्च न्यायालयाने आसारामला वैद्यकीय कारणास्तव तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याच अंतर्गत राजस्थान उच्च न्यायालयात जामिनाची मुदत वाढवण्यासाठी अर्जही दाखल करण्यात आला. गुजरात उच्च न्यायालयाने केलेली वैद्यकीय तपासणी न्यायालयाने पुरेशी मानत पुन्हा तपासणीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट पेले.









