Asaniye – Tambuli Road breathed a sigh of relief
असनिये गाव विकास युवा शक्तीने केली साफसफाई
ओटवणे प्रतिनिधी
असनिये – तांबुळी या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडूनअसनिये गाव विकास युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस या श्रमदानाने साजरा केला. त्यामुळे वाहतुकीस धोकादायक बनलेल्या या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहन चालकांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.तांबुळी – असनिये हा मुख्य रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असुन हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. मूळात हा रस्ता अरुंद असून त्यात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे अनेकवेळा या रस्त्यावर लहानसहान अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अखेर या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीची श्रमदानातून साफसफाई करण्याचे असनिये गाव विकास युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी ठरविले.
त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच रविवारी असनिये गाव विकास युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तोडण्यास प्रारंभ केला. गाव विकास युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी या श्रमदानात उस्फुर्त सहभाग घेतला. या उपक्रमाचे असनिये आणि तांबुळी परिसरातून कौतुक होत आहे.









