वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानचा कसोटी संघातील भरवशाचा फलंदाज आसद शफिकने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 37 वर्षीय शफिकने पत्रकार परिषदेत रविवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
2010 ते 2020 या 10 वर्षांच्या कालावधीत पाक कसोटी संघात आसद शफिक हा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला गेला. त्याने 77 कसोटीत 38.19 धावांच्या सरासरीने 4,660 धावा जमविताना 12 शतके आणि 27 अर्धशतके झळकाविली आहेत. पाक कसोटी संघाची फलंदाजीची भिस्त त्यावेळी आसद शफिक, अझहर अली, युनूस खान आणि मिसबाह ऊल हकवर होती. 2020 साली आसद शफिकला पाकच्या कसोटी संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने तीन वर्षे राष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला सहभाग दर्शविला होता. आसद शफिकने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 60 वनडे आणि 10 टी-20 सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे.









