पुणे / प्रतिनिधी :
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. बाबरी पाडली तेव्हा पक्षाचे नव्हे, तर विश्व हिंदू परिषदेचे नेतृत्व होते, असे मी म्हणालो होतो. मात्र, माझ्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणे ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला, असा खुलासा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी वक्तव्यावर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
पाटील म्हणाले, मी साधा आणि सरळ माणूस आहे. ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे माझ्यावर कोण काय करतंय हे मला कळत आहे. मी जे बोललो त्याचा अनेकदा ‘ध चा ‘मा’ झाला आहे. पण मला त्या मुलाखतीत असे म्हणायचे होते की शिवसेना तिथे नव्हती, सगळे लोक विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात तिथे होते. याशिवाय मी मांडलेली भूमिका माझी वैयक्तिक भूमिका आहे.
मी अनादर केला, हे सहन करणार नाही
बाबरी आंदोलनात आम्ही सर्व जण हिंदू म्हणून सहभागी झालो होतो. बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी त्यांचा अनादर केला, ही बाब मी सहन करणार नाही. बाबरी पाडताना तिथे शिवसैनिक होते. फक्त ते विश्व हिंदू परिषदच्या नेतृत्वात सहभागी झाले होते. बाबरी पाडताना संजय राऊत कुठे होते? हा माझा मुख्य सवाल होता, असे त्यांनी सांगितले.
बाबरी पाडताना सर्व हिंदू होते
विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात हा संघर्ष झाला. त्यावेळी सर्व जण हिंदू म्हणून तिथे होते, कुणीही तिथे पक्ष म्हणून सहभागी झाले नव्हते. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना होती, यावर माझा आक्षेप आहे. जयंत पाटील काय म्हणाले यांची काळजी करण्याची मला गरज नाही. मला उद्धव ठाकरे काय म्हणाले, यांची काळजी असायला हवी. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माझ्यामनात श्रद्धा आहे. उद्धव ठाकरेंच्या टिपण्णीवर मी काही बोलणारच नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.