अध्याय अठ्ठाविसावा
अज्ञानी किंवा सामान्य मनुष्य आणि आत्मज्ञानी मनुष्य ह्यामधील फरक भगवंत उद्धवाला समजावून सांगत आहेत. ते म्हणाले ज्ञानी मनुष्य देही असून विदेही असतो म्हणजे तो देहात असतो परंतु त्यांची वर्तणूक देहात नसल्यासारखी असते. देही मनुष्य त्याला वाटतंय म्हणून संसारी कर्मे करत असतो. त्याचे अपेक्षित फल मिळाले तर तो सुखी होतो, मिळाले नाही तर दु:खी होतो. तसेच केलेल्या कर्मामुळे निर्माण होणारे पापपुण्य त्याच्या पुनर्जन्मास कारण होते. ते भोगल्याशिवाय त्यांची सुटका होत नाही. ज्ञानी मनुष्य स्वत:च्या इच्छेने कोणतेच कर्म करत नसल्याने त्याला त्यातून काही मिळवायचेही नसते. त्यामुळे तो सुखदु:खाच्या पलीकडे गेलेला असतो. साहजिकच तो करत असलेल्या कर्माचे बंधन म्हणजे त्यातून निर्माण होणाऱ्या पापपुण्याची त्याला बाधा होत नाही. त्यामुळे त्याला पुनर्जन्म नसतो. अशा व्यक्तींना ऋषीमुनी म्हणायला हरकत नाही. त्यांचे वर्णन मी गीतेच्या चौदाव्या अध्यायात केले आहे. ते असे, सर्व ज्ञानामध्ये थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा । जे जाणूनि इथे मोक्ष पावले सगळे मुनि ।1 । ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे । जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे।2। सामान्य माणूस संसारात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा स्वत:च्या बुद्धीनुसार अर्थ लावत असतो आणि ते खरा धरून चालतो. त्यामुळे प्रपंचाचे भान माणसाला बाधते परंतु स्वानुभवाने सज्ञान मनुष्य केवळ एक परब्रह्म सत्य मानत असल्याने त्याला प्रपंचातल्या गोष्टी मिथ्या वाटतात. त्या प्रत्यक्ष समोर दिसत असल्या तरी त्या खोट्या आहेत हे तो पुरेपूर जाणून असतो. ज्याप्रमाणे झोप लागल्यावर स्वप्न पडते. त्यातील गोष्टी मनुष्य जोपर्यंत झोपेत असतो, तोपर्यंत त्याला खऱ्या वाटतात परंतु जाग आल्यावर त्या निरर्थक ठरतात. त्याप्रमाणे सज्ञानी माणसाला प्रपंच हा स्वप्नातल्या गोष्टीप्रमाणे वाटतो. तो निजात्मस्वरूपाबाबत जागृत असल्याने प्रपंच मिथ्या आहे ह्याबद्दल त्याला बालंबाल खात्री असते. असे प्रपंचाचे मिथ्यत्व ज्यांनी जाणले त्यांना कर्मे केल्यावर मी कर्म केले असा देहाभिमान कधीच उत्पन्न होत नाही. भगवंतांचे हे बोलणे ऐकल्यावर असे वाटते की माणसाला विकारांची बाधा का होत असावी? ह्यावर सविस्तर माहिती देऊन साधकाचा स्वार्थ साधून द्यावा म्हणून पुढील विवेचन भगवंत करत आहेत. त्यामध्ये मनुष्य विकारवंत का आणि केव्हा होतो ह्यावर ते भर देत आहेत. ते म्हणाले, माणसाला वस्तूमुळे प्रेम, द्वेष आणि त्याचा परिणाम म्हणून अनुक्रमे सुख दु:ख असे विकार जडतात असे वाटण्याची शक्यता आहे पण वस्तू मनुष्य विकारी व्हायला कारणीभूत नसते. माणसाला पूर्वकर्मानुसार अतर्क्य असा प्रपंच प्राप्त होतो. तो त्रिगुणयुक्त असल्याने ज्या गुणाचे प्रभुत्व असते त्यानुसार तो अनेकरूपी भासतो. नाम, रूप, व्यक्ति, वर्ण, कुळ, गोत्र, क्रियाचरण अशी प्रपंचाची अनेक रूपे त्याला भासतात. माणसाला ते सर्व सत्य वाटते. माणसाचे चित्त प्रपंचातल्या वस्तूच्या ठिकाणी गुंतलेले असते. त्यामुळे ती वस्तू आपल्याला अनुकूल आहे असेच त्याला वाटते. वस्तू आहे तशी न दिसता वेगळीच वाटण्यात स्फटिकाचा हात कुणी धरू शकणार नाही. स्फटिक स्वत: कोणत्याच रंगाचा नसतो परंतु तो ज्या वस्तूवर ठेवला जातो त्या रंगाचा तो भासतो. माणसाला जग असेच त्याला हव्या असलेल्या स्वरुपात आहे असे वाटते. स्फटिक हा रंगहीन असून अत्यंत पारदर्शक असल्याने तो ज्यावर ठेवला आहे त्या रंगाचा दिसतो हे माणसाला माहित असते. तरीपण त्याला स्फटिकाचे रंग बदलणे पाहून आश्चर्य वाटते. अर्थात ही आत्म्याची चूक असते. त्याप्रमाणे जग आहे तसे न दिसता वेगळेच वाटणे ही जगाची नसून जगाशी एकरूप झाल्यामुळे स्वत:ला कर्ता समजणाऱ्या आत्म्याची करामत असते. माणसाचा आत्मा हा विकारी असतो. त्यामुळे अज्ञानी मनुष्य अविचाराने वागतो. त्या अज्ञानाची निवृत्ती झाली की, साधकाला माझी सहजी प्राप्ती होते.
क्रमश:








