मडगाव, फातोर्डातील नागरिकांच्या गटाकडून पाहणीनंतर दावा : सौंदर्य वाढण्याऐवजी मैदानाची रया गेल्याची टीका
मडगाव : मडगावातील लोहिया मैदानाच्या नूतनीकरणाचे काम येथील विजेचे ट्रान्सफॉर्मर्स हलविण्यात आले नसल्याने अपूर्णच राहिले असल्याचा दावा मडगाव आणि फातोर्डातील काही नागरिकांकडून करण्यात आला आहे. रविवारी सकाळी लोहिया मैदानाला भेट देऊन या नागरिकांच्या गटाने पाहणी केली असता नूतनीकरणाच्या आराखड्यात विजेचे दोन ट्रान्सफॉर्मर्स येथून हटविण्याची बाब समाविष्ट होती, असा दावा शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केला. सदर ट्रान्सफॉर्मर्स हटविल्याशिवाय या मैदानाचे उद्घाटन करणे योग्य नसल्याचा सूर काहींनी आळवला. यावेळी गोवा फॉरवर्डचे दिलीप प्रभुदेसाई, मोहनदास लोलयेकर, माजी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, फातोर्डा फॉरवर्डचे नगरसेवक रवींद्र नाईक, निमिशा फालेरो, फ्रान्सिस जोनास तसेच जुझे मारियो मिरांडा, अॅथनी, माजी नगरसेविका राधा कवळेकर, दामोदर वंसकर व अन्य उपस्थित होते. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी लोहिया मैदानावरील सदर ट्रान्सफॉर्मर्स हटविण्यासंबंधी संबंधितांची बैठक घेतली होती. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई हे बाहेरगावी असल्याने त्यावेळी पक्षाच्या वतीने आपण सदर बैठकीला उपस्थिती लावली होती, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. सदर ट्रान्सफॉर्मर्स नवीन कामत हॉटेलनजीक उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होत. त्यामुळे हे काम करण्यास जादा कालावधी लागणार नाही आणि वीजपुरवठाही जास्त काळ खंडित करावा लागणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. तरी ते ट्रान्सफॉर्मर्स का हटविण्यात आलेले नाहीत, असा सवाल प्रभुदेसाई यांनी केला. सदर ट्रान्सफॉर्मर्सच्या आतील बाजूने उंच भिंत उभारली गेल्याने या मैदानाची रया गेली आहे. त्यातच बाहेरून लोहिया मैदानाचे सौंदर्यीकरण झाल्याचे दिसतच नाही. डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा या भिंतीमुळे आडोशाला पडल्याची टीका यावेळी बहुतेकांनी केली. ट्रान्सफॉर्मर्सवर झळकविण्यात आलेल्या जाहिराती, बॅनर्समुळे या भागाला बकाल स्वरूप प्राप्त होत असल्याची कैफियतही यावेळी मांडण्यात आली.









