इंद्राच्या दरबारात अनेक अप्सरा दिवसभर देवांची सेवा करताना धावपळ करताना दिसायच्या. इकडे तिकडे लगबगीने काम करत आपला सगळा दिवस घालवायच्या. संध्याकाळ झाली की मात्र त्यांना कंटाळा यायचा. कुठेतरी लांब फिरून यावं म्हणून त्या पाय मोकळं करायला निघायच्या. स्वर्गामध्ये असलेल्या बागा खूप सुंदर होत्या. तिथे जाताना त्यांच्या मनाला कमालीचा आनंद व्हायचा. एक दिवस फिरता फिरता या बागेत उशीर झाला आणि त्यांचा रस्ताच हरवला. सगळ्याजणी भराभरा चालत निघाल्या अन् कुठेतरी येऊन पोहोचल्या. तिथे आल्यानंतर कोणी दिसतंय का ते शोधत असताना एका अप्सरेला एक माणूस रडताना दिसला. तिने जवळ जाऊन त्याची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं मी आणि माझ्यासारखी कितीतरी माणसं पाण्यासाठी व्याकुळ झाली आहेत. काय करावं काही कळत नाही. त्या अप्सरेने आपल्या जवळच्या कमंडलूमधलं थोडं पाणी त्याला प्यायला दिलं. त्याला खूप तरतरी आली. त्यांनी सांगितलं उद्या माझ्याबरोबर मी माझ्या नातेवाईकांना घेऊन येईन त्यांनापण द्याल का तुम्ही हे पाणी. अप्सरा हो म्हणाली. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना पाणी मिळणार म्हणून आनंद झाला. या पाण्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. दुसरीकडे मात्र एका अप्सरेला तहानलेली शेतं दिसली. जमिनीला पडलेल्या भेगा पाहून तिला खूप वाईट वाटलं. ती जमीन पाणी मिळेल या आशेने तिच्याकडे बघत होती, पाण्याची मागणी करत होती. तिने दिलेल्या ओंजळभर पाण्याने सुखावून जात होती. तिसरीकडे तिसऱ्या अप्सरेला व्याकुळ झालेले प्राणी भेटले. त्याही प्राण्यांना तिने आपल्या कमंडलूमधील पाणी दिलं. अशा या वेगवेगळ्या अप्सरांना वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यासाठी तहानलेली माणसं दिसल्याने आता काय करावं असा प्रश्न पडला होता. तो पर्यंत दुसरा दिवस उजाडायला आला. अप्सरांना आता परत जायचे वेध लागले होते. परंतु काही केल्या त्यांना मार्ग मिळत नव्हता. इतक्यात आकाशवाणी झाली. तुम्ही इंद्रदेवांची परवानगी न घेता स्वर्गातून खाली पृथ्वीवर आला आहात आता जोपर्यंत तुम्ही परोपकार किंवा सत्कार्य करत नाही तोपर्यंत पुन्हा तुम्हाला स्वर्गात जागा नाही. त्या अप्सरांना कळून चुकलं. आता आपलं काही खरं नाही. त्यांनी देवाला पुन्हा उश्याप मागितला की आम्हाला पाण्याचं स्वरूप दे म्हणजे आम्ही या लोकांची तहान भागवू शकू, त्यांना जीवन देऊ शकू, त्यांच्यासाठी आनंद निर्माण करू शकू. देवाने तथास्तु म्हटलं आणि ह्या सगळ्या अप्सरा नद्यांच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवर हजारो वर्ष वाहतच आहेत. या नद्यांच्या पाण्याची वाफ होऊन या अप्सरा स्वर्गात गुपचूप कधीतरी जाऊन येत, परंतु पुन्हा पाण्याच्या रूपात खाली येऊन या नद्यांमध्ये एकरूप होऊन जायच्या. आता या नद्यांना कधीच वर जायची इच्छा होणार नव्हती. कारण त्यांच्या बरोबरीने त्यांनी आपल्या अवतीभवती उत्तम स्वर्गच निर्माण केला होता. अनेकांची तहान भागवली होती. अनेकांची शेतं हिरवीगार केली होती. झाडांना फळफुलं दिली होती, शेतातून अन्नधान्य तरारून आलं होतं. त्यामुळे स्वर्ग फक्त देवांच्या तिथे असतो असं नाही तर तो या पृथ्वीवरती आपण निर्माण करू शकतो याची कल्पना त्यांना आल्यामुळे त्यांनी आपलं नद्यांचं रूपच कायम धारण केलेलं आहे. अशाप्रकारे नद्या पृथ्वीवरती अवतीर्ण झाल्या असं सांगितलं जातं.
Previous Articleबडोद्याला नमवत मुंबई फायनलमध्ये
Next Article तामिळनाडूत रुग्णालयाला आग, 6 ठार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








