तालुक्याच्या पूर्व भागातील चित्र : शिवारातील सर्व पाणी आटले : शेतकरीवर्ग हवालदिल
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये दिवसेंदिवस पाऊस लांबत चालल्याने दुष्काळाचे सावट आणखीन गडद होऊ लागले आहेत. शिवारातील सर्व पाणी आटले असून भातपिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, मावीणकट्टी, मोदगा, सुळेभावी, आदी गावामध्ये भातपिके मोठ्याप्रमाणावर घेण्यात येतात. मात्र गेल्या पंधरा-वीस दिवसापासून पूर्व भागात अजिबात पाऊस झालेला नाही. सध्या भातपिके करपू लागली असून भात पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज आहे. .पुढील तीन-चार दिवसात मोठा पाऊस न झाल्यास भातपिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
अंतिम टप्प्यातील रोप लागवडीला ब्रेक
सध्या पूर्व भागामध्ये पावसाने ओढ दिली आहे त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या रोप लागवडीला ब्रेक लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी रोप लागवडीसाठी शेतामध्ये चिखल करून ठेवला होता. मात्र पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यात असलेली रोप लागवडीची कामे थांबवली असून रोप लागवड करण्याचे रद्द केले आहे. तसेच चिखल केलेल्या शेतामध्ये इतर भाजीपाला पिके घेता येतात काय, याची चाचपणी करू लागले आहेत .
विहिरी -कूपनलिकांद्वारे भातपिकांना पाणी
पूर्व भागामध्ये मोठ्याप्रमाणावर धूळवाफ पेरणी केली जाते. सध्या भातपिके काहीशी चांगली असली तरी पावसाअभावी भातपिके करपू लागली आहेत. त्यामुळे भातपिकांना विहिरी व कूपनलिकांद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.
तणाचे प्रमाण वाढले
भात पिकामध्ये सध्या भांगलणीची कामे सुरू आहेत. मात्र सध्याचे वातावरण हे तणासाठी पोषक असल्याने भातपिकामध्ये तणाचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले आहे .त्यामुळे भांगलणीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च सोसावा लागत आहे.
पूर्व भागातील तलाव अद्याप खालीच
मध्यंतरी जुलै महिन्यामध्ये झालेला पाऊस वगळता पूर्व भागामध्ये दमदार पाऊस झालेलाच नाही. त्यामुळे पूर्व भागातील एकही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही.









