महात्मा फुले रोडवरील समस्या, दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते जुन्या धारवाड रोडपर्यंत रूंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर काही ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. न्यायालयीन वादामुळे हे काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याठिकाणी वाहनधारकांना धोकादायक बनले असून, अपघात होत आहेत. रस्त्यावर निर्माण झालेल्या समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने उपाय योजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.
महात्मा फुले रोडचे रूंदीकरण जुन्या धारवाडरोडपर्यंत करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी काँक्रिटीकरण प्रलंबित ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी अद्यापही कच्चा रस्ता असल्यने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. न्यायालयीन वाद असल्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण कच्चा रस्ता आणि काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या ठिकाणी रॅम्प नाही. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना धोकादायक बनले आहे.
या ठिकाणी दुचाकी वाहनधारक घसरून पडत असल्याने अपघात होत आहेत. रस्ता खराब असल्याचे रात्रीच्यावेळी लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काँक्रिटीकरण संपलेल्या ठिकाणी माती घालून रस्ता स्लोप करणे आवश्यक आहे. या दृष्टीने महापालिका प्रशासनाने आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.









