कित्तूर चन्नम्मा चौक ते काकतीवेस परिसरात मोहीम राबविण्याचा प्रयत्न
बेळगाव : कित्तूर चन्नम्मा चौकापासून काकतीवेसपर्यंत असलेल्या अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला. मात्र तेथील व्यावसायिकांनी तीव्र विरोध केल्यामुळे मंगळवारी अतिक्रमण मोहीम काहीशी थंडावली. आम्ही अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करत आहे. आमच्यापासून कोणालाच अडथळा नाही. असे असताना तुम्ही आम्हाला हटविता कसे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने माघार घेतली. शहरामध्ये काही ठिकाणी झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेचे पथक प्रयत्न करत आहे. दोन दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमधील पदपथावर ठाण मांडून बसलेल्या खोकेधारकांना हटविले. त्यानंतर इतर ठिकाणीही अतिक्रमण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी कित्तूर चन्नम्मा चौकापासून काकतीवेसकडे जाणाऱ्या खोकेधारकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी गोरगरीब जनता आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यावसाय करत आहेत. आम्ही कोणालाच अडथळा करत नाही. असे असताना आमच्यावर का अन्याय करत आहात. आम्ही मनपाला वेळेवर करही भरत आहे. असे असताना आमच्यावर कारवाई का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच जोरदार विरोधही केला. त्यामुळे अतिक्रमण मोहीम थांबविली आहे.









