सांबरा येथील प्रकार : चालक धारेवर
वार्ताहर /सांबरा
बस थांब्यावर विद्यार्थिनींची संख्या जास्त पाहून दररोज बसथांब्यावर न थांबताच बेळगावकडे जाणाऱ्या बस चालकाला बुधवारी सांबरा येथे विद्यार्थिनींनी चांगलीच अद्दल घडविली. शेवटी बसचालक व वाहकाने उद्यापासून दररोज बस थांब्यावरच बस थांबविण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थिनींनी बसला जाऊ दिले. बुधवारी सुळेभावी येथून सकाळी नऊ वाजता बेळगावकडे जाणारी बस महादेवनगर सांबरा येथील बसथांब्यावर विद्यार्थ्यांची संख्या जास्त पाहून तेथे न थांबताच पुढे निघाली. असाच प्रकार गेल्या बऱ्याच दिवसापासून सुरू होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. अखेर वैतागून सर्व विद्यार्थिनी रस्त्यावर जाऊन थांबल्या व बसला रोखले. बसला रोखल्यानंतर विद्यार्थिनींनी बस चालकाला चांगलेच धारेवर धरले.त्यामुळे बस चालकाची बोलतीच बंद झाली. शेवटी बसचालक व वाहकाने महादेवनगर बसथांब्यावर दररोज बस थांबवण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थिनींनी बसला जाऊ दिले.
सांबरा मार्गावर जादाच्या बस सोडण्याची मागणी
पूर्वी सांबरा गावाला स्वतंत्र बस होती. मात्र, गेल्या काही महिन्यापासून ही बसही रद्द करण्यात आली आहे. बेळगाव-सांबरा मार्गावरील अनेक बसफेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. मोफत बस सेवेमुळे महिला वर्गाची संख्या वाढली आहे. त्यामुळे दररोज कामानिमित्त बेळगावला जाणाऱ्या महिलांची तसेच विद्यार्थी वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. तरी राज्य परिवहन मंडळाने बेळगाव सांबरा मार्गावर जादाच्या बस फेऱ्या सोडाव्यात अशी मागणी विद्यार्थी व नोकरदार वर्गातून करण्यात येत आहे.









