पाटील गल्ली परिसरात समस्येमुळे महिलांनी केला रास्तारोको, आमदार घटनास्थळी दाखल, गटारी साफ करण्याची सूचना
► प्रतिनिधी/ बेळगाव
पाटील गल्ली, परिसरात गटारी तुडुंब भरुन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याचबराब्sार गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिश्रीत होत आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरत आहे. अनेकवेळा महापालिकेला कळवून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे महाशिवरात्री दिवशीच मुख्य रस्त्यावर महिलांनी रास्तारोको केला. यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेचे कर्मचारी आणि आमदार अनिल बेनके तातडीने दाखल झाले. यावेळी महिलांनी साऱ्यांनाच चांगलेच धारेवर धरले.
फोर्ट रोडपासून अंबाभुवनपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण काही वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर गटारी काढण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे ओव्हरब्रिजची उभारणी करण्यात आली. मात्र हे करत असताना गटारींना योग्य दिशा तसेच त्याची खोदाई योग्य प्रकारे करण्यात आली नाही. त्यामुळे आता मोठी समस्या निर्माण होवू लागली आहे. पाटील गल्ली परिसरातील अनेक घरांमध्ये गटारीचे पाणी पावसामध्ये शिरत आहे. याचबरोबर आता संपूर्ण गटारी तुडुंब भरल्या आहेत.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करणे देखील अवघड बनले आहे. गटारीमध्ये माती तसेच प्लास्टीक यामुळे पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तुंबलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे डेंग्यु, चिकनगुनिया, मलेरीया, फ्ल्यु, टायफाईड सारखे आजार उद्भवत आहेत. सततच्या या समस्येला कंटाळून महिलांनी आणि नागरिकांनी या परिसरात रास्तारोको केला.
रास्तारोकोचे आंदोलन करताच मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आमदार अनिल बेनके देखील दाखल झाले. त्यांनी तातडीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर सर्व परिसर फिरुन पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी गटारी पूर्णपणे बुजल्या आहेत. तेंव्हा त्या स्वच्छ कराव्यात, अशी सूचना आमदारांनी केली. जेसीबीच्या सहाय्याने गटारी पुन्हा खोदाई करण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी अडचण असल्यामुळे गटारी काढणे अवघड झाले होते.









