मनपातील कर्मचारी लागले कामाला : 100 सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत हालचाली
बेळगाव : सफाई कर्मचारी संघटनेने गुरुवारी महानगरपालिकेसमोर धरणे धरून मनपा आयुक्तांना निवेदन दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविल्या नाही तर कामगार दिनावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. त्यानंतर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी खडबडून जागे झाले असून 100 सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. शुक्रवारी त्यांच्या कागदपत्रांची छाननी मनपातील अधिकाऱ्यांबरोबर आरोग्य विभागातील निरीक्षकांनी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीनेच काम करत आहेत. 154 कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांपूर्वी कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्यात आले. मात्र 100 कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचे केवळ आश्वासन दिले गेले. गेल्या दीड वर्षांपासून हे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या विरोधात आंदोलन केले. याचबरोबर निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केला. यावेळी आयुक्तांनी पुन्हा आश्वासनच दिले होते.
गुरुवारी महानगरपालिकेसमोर ठाण मांडून त्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेणे, याचबरोबर इतर समस्या सोडविण्याचे निवेदन देण्यात आले. तातडीने या समस्या सोडवा अन्यथा बेमुदत आंदोलन करू. तसेच कामगार दिनावर बहिष्कार घालू, असा इशारा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी महानगरपालिकेमध्ये हालचाली गतिमान झाल्या. त्या 100 कामगारांच्या कागदपत्रांची छाननी आरोग्य विभागातील निरीक्षकांनी सुरू केली. विविध प्रभागामध्ये काम करत असलेल्या त्या कर्मचाऱ्यांच्या कामाबाबतचा तपशील तसेच इतर कागदपत्रे पाहून त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पर्यावरण विभागाचे अभियंते हनुमंत कलादगी, आदिल खान पठाण यासह इतर अधिकारी व कर्मचारी त्या कामाला लागले होते. यापूर्वी एकमेकांकडे बोट करून नियुक्तीबाबत चालढकल सुरू केली होती. मात्र आता या कामाला हे अधिकारी लागल्याने चालना मिळाली असून त्वरित 100 कामगारांना कायमस्वरुपी नियुक्तीची शक्यता निर्माण झाली आहे.









