निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन
बेळगाव : सुवर्णसौधवर अधिवेशनावेळी सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. विविध समस्या तातडीने सोडवा, अन्यथा आम्ही आंदोलन करू म्हणून निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी घेतली. सोमवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आनंदवाडीसह इतर ठिकाणी 253 क्वॉर्टर्स सफाई कर्मचाऱ्यांना मंजूर झाले होते. मात्र अद्याप त्याचे हक्कपत्र दिले नाहीत. ती हक्कपत्रे तातडीने द्या, असे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांसमोर सांगितले. त्यावेळी येत्या आठवड्यामध्ये बैठक घेऊन संबंधितांना हक्कपत्र देवू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आनंदवाडी येथे 188 जणांना तर अजमनगर येथे 49 जणांना तर नेहरूनगर येथे 16 जणांना क्वॉर्टर्स मंजूर झाले आहेत, अशी माहिती आयुक्तांना देण्यात आली. मात्र दहा वर्षे उलटली तरी त्याची हक्कपत्रे दिली जात नाहीत. हा आमच्यावर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. मैलावाहू कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची जनगणती करण्यात आली आहे. त्या जनगणतीनुसार संबंधित कुटुंबांना ओळखपत्र द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर सध्या नियुक्ती करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांबाबत विचारले असता आयुक्तांनी 155 कर्मचाऱ्यांना 4 डिसेंबरपर्यंत नियमानुसार नियुक्तीप्रमाणपत्र दिले जाणार आहे. तर 100 आणि 134 सफाई कर्मचाऱ्यांची थेट नियुक्ती केली जाणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
निवृत्त कर्मचाऱ्यांना जगणे कठीण
काही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधून भाडे कपात केली जात आहे. त्यामुळे त्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. तेव्हा ती भाडेकपात थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर निश्चितच थांबविले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. निवृत्त झालेला कर्मचारी ओबळाप्पा आनंदपूर यांच्याकडून महापालिकेतील अधिकारी 1 लाख रुपये लाच मागत होता. त्यावेळी मनपा उपायुक्त उदयकुमार यांनी त्याची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्या कर्मचाऱ्याला सर्व सुविधा द्याव्यात, असेही सांगण्यात आले. या बैठकीला सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला, विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी, मालती सक्शेना, यल्लेश बळ्ळारी, फिलोमीन कुंचम यांच्यासह इतर पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









