जम्मू-काश्मीरसंबंधी राहुल गांधींचे आश्वासन
वृत्तसंस्था/ जम्मू
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू येथे प्रचारसभेला संबोधित केले आहे. यादरम्यान त्यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा, कर आणि जीएसटी यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला. भारताच्या इतिहासात अनेक केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा देण्यात आला, परंतु पहिल्यांदाच एका राज्याला केंद्रशासित प्रदेश करण्यात आले असून हे जम्मू-काश्मीरसोबत घडले आहे. हा प्रकार जम्मू-काश्मीरच्या लोकांसोबत अन्याय असून जनतेला लोकशाहीद्वारे मिळालेले अधिकार हिरावून घेण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेल असे आमचे मानणे होते. परंतु असे घडले नाही. आता लवकरात लवकर येथील जनतेला लोकशाहीचा हक्क मिळावा. जम्मू-काश्मीरमध्ये आमचे सरकार स्थापन होताच आम्ही राज्याचा दर्जा मिळवून देऊ असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
जम्मू येथील मध्यवर्ती केंद्र आहे. जम्मू काश्मीरचा उद्योग अन् व्यवसायाला पूर्ण देशाशी जोडते, परंतु भाजप सरकारने या मध्यवर्ती केंद्राची भूमिका संपुष्टात आणत येथील लघू अन् मध्यम उद्योगाचा कणा मोडला आहे. जोपर्यंत जम्मू-काश्मीरमधील लघू अन् मध्यम उद्योग स्वत:च्या पायांवर उभे राहत नाही तोवर येथे रोजगार निर्माण होणार नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सध्या देशाचे सरकार अदानी आणि अंबानी यासारख्या अब्जाधीशांसाठी चालविले जात आहे. जीएसटी एक अस्त्र असून ज्याद्वारे जम्मू-काश्मीरच्या छोट्या अन् मध्यम उद्योगांवर हल्ला करण्यात आला आहे. नोटबंदी आवणि चुकीच्या जीएसटीने देशातील लाखो उद्योग संपविल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.









