अधीक्षक गिरीधर कुलकर्णी यांची गुलबर्गा येथे मुख्य अभियंते म्हणून बढती
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे सत्र संपताच आता बदल्यांना सुरुवात झाली आहे. हेस्कॉममध्ये अधिकाऱ्यांची खांदेपालट सुरू झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या इतरत्र करण्यात आल्या. हेस्कॉमचे बेळगाव विभागीय अधीक्षक गिरीधर कुलकर्णी यांची गुलबर्गा येथे मुख्य अभियंते म्हणून बढती झाल्याने या जागी आता कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी बदलीचे सत्र थांबविण्यात आले होते. हेस्कॉममध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्या बढतीला निवडणुकीमुळे खो बसला होता. निवडणूक संपताच आता बदली व बढतीला सुरुवात झाली आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून बेळगाव व खानापूर तालुक्याच्या अधीक्षक अभियंतापदी गिरीधर कुलकर्णी काम करीत होते. मध्यंतरीच्या काळात बेळगाव मुख्य अभियंता हे पद रिक्त असल्यामुळे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले. निवडणुकीनंतर त्यांची बदली गुलबर्गा येथे मुख्य अभियंता म्हणून करण्यात आली. त्यांना बढती देण्यात आली असून त्यांच्या जागी आपलीच वर्णी लागावी, यासाठी हेस्कॉमचे अधिकारी प्रयत्नशील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली केव्हा?
हेस्कॉमचे अनेक अधिकारी व कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागातच सेवा बजावत आहेत. वास्तविक पाहता प्रत्येक चार वर्षांनी त्यांची इतर विभागीय क्षेत्रात बदली होणे आवश्यक असते. परंतु मध्यंतरी आलेल्या कोरोनामुळे अनेकांची बदली स्थगित करण्यात आली होती. बेळगाव शहरात अनेक व्यावसायिक कनेक्शन्स असल्यामुळे बरेच अधिकारी शहरामध्येच सेवा बजावण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे येत्या महिन्याभरात अजून किती जणांची बदली होणार? हे स्पष्ट होईल.
रिक्त पदे भरणे आवश्यक
कोरोनानंतर हेस्कॉममधील अनेक पदे रिक्त आहेत. बऱ्याच ठिकाणी सेक्शन ऑफिसर, ज्युनियर इंजिनिअर, लाईनमन, कार्यालयीन कर्मचारी यांची कमतरता आहे. याचा परिणाम हेस्कॉमच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. त्यामुळे राज्यात नवीन सरकार आल्यानंतर तरी ही रिक्त पदे भरली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









