सांगली :
जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, इस्लामपूर येथे स्वतंत्र उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी माजी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या भेटीवेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खोत यांनी सांगितले.
वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील सुमारे 8 लाखांहून अधिक लोकसंख्येला सध्या वाहन नोंदणी, परवाना, आणि इतर वाहतूकसंबंधी कामांसाठी सांगली येथील जिल्हा मुख्यालय गाठावे लागते. सांगली हे इस्लामपूरपासून 70-80 किमी अंतरावर आहे, ज्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. केवळ इस्लामपूर शहराची लोकसंख्या सुमारे एक लाख आहे, आणि या भागातील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत इस्लामपूर येथे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थापना झाल्यास स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल आणि प्रशासकीय कामे अधिक सुलभ होतील. असे खोत यांनी निवेदनात म्हटले आहे.
आमदार सदाभाऊ खोत यांनी या समस्येची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा केली. त्यांनी निवेदनात नमूद केले की, इस्लामपूर येथे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन झाल्यास स्थानिक नागरिकांचा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचेल, तसेच प्रशासनाला स्थानिक पातळीवर काम करणे सोयीचे होईल. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या मागणीला पाठिंबा देत स्थानिकांच्या अडचणी मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
- जतच्या यशानंतर इस्लामपूरची आशा
नुकतेच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले आहे. या यशाने प्रेरित होऊन सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूरसाठीही असाच पाठपुरावा सुरू केला आहे. जत येथील कार्यालयामुळे तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, इस्लामपूरसाठीही अशीच सुविधा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करत यामुळे स्थानिक रोजगार वाढून शेतकरी आणि नागरिकांचा वेळ वाचेल असे खोत म्हणाले.








