हलकर्णी
एका एकरात 80 दिवसात सुमारे 40 हजार रुपये खर्च
कोबी दर घसरल्याने खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथील कुमार पाटील या शेतक्रयाने आपल्या एका एकरातील कोबी प्लॉटवर रोटर फिरवला. सध्या बाजारपेठेमध्ये घाऊक पद्धतीने दोन ते तीन रुपये दर मिळत आहे. संकेश्वर मार्केट मध्ये काही वेळा कोबीचा सौदा सुद्धा होत नाही या सगळ्याला कंटाळून या शेतकऱ्याने कोबी पिकावर रोटर फिरवून पीकच नष्ट करून टाकले आहे.
पाटील यांनी गडहिंग्लज जवळील एका रोपवाटिकेतून कोबीची प्रतिरोप 50 पैसे दराने 33 हजार रोपे 16 हजार 500 रुपयांना खरेदी केली होती. ऑक्टोबर महिन्यात या रोपांची लागण केली. लावण पूर्व औतकाम, रोप लावणीसाठी 7 हजार रुपये, खताची मात्रा, कीटकनाशक फवारणीसाठी 7 हजार रुपये, भांगलणीसाठी 5 हजार रुपये, ट्रॅक्टर औतकाम या सर्वासाठी त्यांनी 80 दिवसात सुमारे 40 हजार रुपये खर्च केले होते. दर घसरल्यामुळे पिकासाठी केलेला खर्च सुद्धा कोबी उत्पादनातून निघत नाही हे पाहून हाताश झालेल्या शेतकऱ्याने कोबी प्लॉटवर रोटर फिरवला आहे.
ऊस पिकाला लागणारा मोठा कालावधी, करावा लागणारा वारेमाप खर्च, तोडणीसाठी वाहनधारकांची करावी लागणारी मनधरणी आणि टोळीवाल्यांना द्यावी लागणारी चिरमीरी या सर्वांतून शेतकऱ्यांच्या हातात राहते ती केवळ तुटपूंजी कमाई. कुटुंबाला अर्थाधार मिळण्यासाठी शेतकरी भाजीपाला पिकाकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे. मात्र पीक काढणीला आल्यावर दर घसरला तर काबाडकष्ट करून पिकवलेला भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी व दर नियंत्रणासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी भाजीपाला उत्पादकांची मागणी आहे.
Previous Articleकेळीचे खुंट, पपईच्या बुंध्यापासून रंगीत धागे
Next Article लहानग्यांनी कर्दे बीचवर अनुभवले आकाश दर्शन








