वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अॅनाबेल सदरलँडने या वर्षाच्या अखेरीस होणार असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाबद्दल आपले विचार व्यक्त करताना तयारीच्या महत्त्वावर जोर दिलेला आहे. आम्हाला स्पर्धा खेळण्याआधी शक्य तितकी तयारी करावी लागेल. या वर्षाच्या शेवटी विश्वचषक होणार हे सर्वांच्या मनात ठासलेले आहे, असे ती म्हणाली.
दमदार कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सदरलँडने महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये व्हिक्टोरिया आणि मेलबर्न स्टार्सतर्फे देशांतर्गत स्तरावर प्रभाव टाकल्यानंतर 2020 च्या सुऊवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविऊद्ध वाका येथे झालेल्या कसोटी सामन्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिने 210 धावा काढल्या होत्या आणि पाच बळी घेतले होते.
महिला बिग बॅश लीगच्या तुलनेत महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याच्या आव्हानाबद्दल विचारले असता सदरलँडने भारतीय आणि ऑस्ट्रेलियन देशातील खेळाडूंमधील सांस्कृतिक फरकाकडे लक्ष वेधले. ‘सांस्कृतिकदृष्ट्या भारतीय खेळाडूंच्या बाबतीत खूप फरक आहेत. मला त्यांना जाणून घेताना खूप आनंद झाला आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचा हा एक चांगला भाग आहे’, असे तिने महटले आहे.
बिग बॅश लीगला आता दहा वर्षे झाली आहेत. मला वाटते की, त्यातील खेळाडू थोड्या अधिक अनुभवी आहेत आणि त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारची धीरगंभीरता आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू व्यावसायिक स्तरावर जितक्या प्रमाणात खेळल्या आहेत त्याचा विचार करता भारतीय महिला सुधारत जातील असे मला वाटते. तुम्ही जितके जास्त खेळता तितके तुम्ही वेगवेगळ्या दबावाच्या परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम बनता असे मला वाटते, असे सदरलँडने म्हटले आहे.









