चीनच्या कंपनीने अजब पद्धतीने वाटला 70 कोटीचा बोनस
चीनच्या एका क्रेन कंपनीने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना कथितपणे 70 कोटी रुपयांचा बोनस ऑफर केला. परंतु हा बोनस मिळविण्यासाठी एक अट ठेवण्यात आली होती, ‘जितक्या नोटा मोजू शकाल तितक्याच घरी नेता येतील’ अशी ही अट होती.
चीनची हेनन मायनिंग क्रेन को लिमिटेडने अलिकडेच स्वत:च्या कर्मचाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस बोनस दिला. या कंपनीने एका टेबलवर रोख रक्कम पसरविली आणि मग कर्मचाऱ्यांना जितके पैसे मोजाल तितके घरी नेऊ शकतात असे सांगितले. कंपनीने बोनसचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना कमाल 15 मिनिटांचा वेळ दिला होता.
या अनोख्या बोनसचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका मोठ्या टेबलवर नोटांचा ढिग पसरविण्यात आल्याचे दिसून येते. तसेच कर्मचारी शक्य तितक्या नोटा उचलताना दिसून येतात. एका कर्मचाऱ्याने निश्चित वेळेत 1 लाख युआन म्हणजेच 12.07 लाख रुपये जमा केल्याचे समजते.
हेनन मायनिंगच्या बोनस वाटण्याच्या पद्धतीवर सोशल मीडिया युजर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी यावर आनंद तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कंपनीचा मालक मोठ्या मनाचा असल्याचे म्हटले आहे. हा कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविणारा पुढाकार असून यामुळे ते आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरित होतील असे एका युजरने नमूद केले आहे. तर अन्य एका युजरने हा प्रकार अपमानास्पद असल्याची टिप्पणी केली आहे.
हेनान मायनिंग क्रेन कंपनी पहिल्यांदा अशाप्रकारच्या मोठेपणासाठी चर्चेत आलेली नाही. कंपनीने 2023 मध्ये देखील स्वत:च्या वार्षिक डिनरदरम्यान स्वत:च्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना आकर्षक इनाम देणारी कंपनी म्हणून याची प्रतिष्ठा वाढत आहे.









