जिल्ह्यात एकूण 22 हजार 227 खटले निकालात
प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीय लोकअदालत संपूर्ण जिल्ह्यामधील न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आली होती. शनिवार दि. 8 रोजी ही लोकअदालत पार पडली. यामध्ये 22 हजार 227 खटले निकालात काढण्यात आले. त्यामध्ये तब्बल 101 कोटी 27 लाख 33 हजार 784 रुपयांची देवघेव झाली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त रक्कम देवघेव झाली असून जनतेने लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मी देवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कायदा सेवा प्राधिकारच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्वच न्यायालयांमध्ये ही लोकअदालत भरविण्यात आली. बेळगावातील 20 हून अधिक न्यायालयांमध्ये लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक तालुक्यातील न्यायालयामध्येही आयोजन केले होते. त्याला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या लोकअदालतीमध्ये 116 फौजदारी, 1004 चेकबॉन्स, 70 बँक करवसुली, वीजबिलासंदर्भातील 117, कौटुंबिक 35, भूसंपादन 40 आणि विविध प्रकारचे 881 खटले निकालात काढण्यात आले आहेत. एकूण 22 हजार 227 खटले निकालात काढण्यात आले. त्यामध्ये 101 कोटीहून अधिक रुपयांची रक्कम देवघेव करण्यात आली. संपूर्ण राज्यामध्ये लोकअदालत भरविण्यात आली होती. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खटले निकालात काढण्यात आल्याचे मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मी देवी यांनी सांगितले.









