भरतीसाठी लवकरच तयार करणार प्रस्ताव : मुख्यमंत्री
पणजी : राज्यातील शासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल 838 शिक्षक व मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षकांपासून ते जिल्हा शिक्षण निरीक्षक सहाय्यकांपर्यंतची पदेही समाविष्ट असून ही रिक्त पदे शिक्षण खात्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील अतारांकित प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे. आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, यातील काही प्रमुख जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रिक्त पदे चिंतेचा विषय
मुख्यमंत्री डॉ. सावंत एका बाजूला शिक्षणाचा प्रसार व प्रचार करताना दिसत आहेत. आधुनिक शिक्षणपद्धती अंमलात आणल्या जात आहेत. राज्यातील साक्षरता दरही वाढत आहे. परंतु या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असणे ही अत्यंत गंभीर व चिंतेची बाब ठरत आहे.
भरतीचे प्रस्ताव संबंधित आधिकारिणींकडे
रिक्त पदांपैकी 318 प्राथमिक शिक्षक, 14 इंग्रजी शिक्षक, आणि 118 सहाय्यक शिक्षक अशा एकूण 450 पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव गोवा कर्मचारी निवड आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. शिवाय 111 शिक्षक ग्रेड-1/सहाय्यक जिल्हा शैक्षणिक निरीक्षक पदे गोवा लोकसेवा आयोगाकडे भरतीसाठी पाठविण्यात आली आहेत. तर 21 मुख्याध्यापकांच्या पदभरतीसाठीचा प्रस्ताव सध्या गोवा लोकसेवा आयोगाकडे थेट भरती प्रक्रियेसाठी सादर करण्याच्या प्रक्रियेत आहे. सर्व पदे भरण्यासाठी गोवा कर्मचारी निवड आयोग आणि गोवा लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लवकरच जाहिरात करण्यात येणार आहेत. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला गती मिळावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या दृष्टिकोनातून ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.
शिक्षणखात्यातील रिक्त पदे
- शासकीयप्राथमिकशाळांमध्ये 347 शिक्षकांची व 14 प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांची पदे.
- माध्यमिकवउच्च माध्यमिक स्तरावर 208 सहाय्यक शिक्षक, 29 चित्रकला शिक्षक, 3 संगणक शिक्षक, 211 शिक्षक ग्रेड-1/सहाय्यक जिल्हा शिक्षण निरीक्षक पदे रिक्त.
- 26 मुख्याध्यापकांचीपदेरिक्त.









