उमेदवारांची गर्दी, ग्रामीण भागातील अधिक अर्जदार
पणजी : होमगार्ड खात्यात आता लवकरच भरती होणार असून, या प्रक्रियेसाठी होमगार्डच्या 143 पदांसाठी तब्बल 8 हजार अर्ज आलेले आहेत. आल्तिनो-पणजी येथील जीआरपी कॅम्पमध्ये हजारो उमेदवारांनी काल बुधवारी सकाळपासून गर्दी केली होती. अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये ग्रामीण भागातील अर्जदार अधिक आहेत. होमगार्ड विभागात सध्या नवीन नवीन बदल होत आहेत. होमगार्ड जवानांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा यांच्यातही वाढ झालेली आहे. शिवाय पोलिस, अग्निशमन, वन विभाग, अबकारी गार्ड या ठिकाणी 10 टक्के आरक्षण मिळत असल्याने साहजिकच होमगार्ड भरतीसाठी आता मोठ्या संख्येने उमेदवार पुढे येत आहेत. बुधवारी महिला उमेदवारांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. तसेच उमेदवारांचा रहिवासी दाखला, जन्म, शिक्षण दाखला व अन्य कागदपत्रांची छाननी करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
गोव्यात सध्या होम गार्डच्या 1500 जागा भरण्यात येणार आहेत. सध्या राज्यात विविध ठिकाणी एकूण 1 हजार 230 होमगार्ड काम करत असून, खूप वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या होमगार्डना बढती तसेच होमगार्डच्या 270 जागा रिक्त असल्यामुळे आता 143 जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जांची छाननी प्रक्रिया 12 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या प्रक्रियेनंतर शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 35 पैकी 14 गुण मिळवणे आवश्यक आहे. निवड झालेल्या होमगार्डना भरती होण्यापूर्वी वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात 45 दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.









